नागपूर - राज्य सरकारनं शेतक-यांसाठी जाहीर केलेल्या पॅकेजवरून विधानसभेत गोंधळ घातल्याबद्दल आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणादरम्यान असंसदीय शब्द वापरल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. हिवाळी अधिवेशन संपेपर्यंत त्यांना सभागृहात उपस्थित राहण्यास मज्जाव करण्यात आलाय. त्यावरून, राष्ट्रवादीनं कामकाजावर बहिष्कार घालण्याचा पवित्रा घेतलाय.
विदर्भ, मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त शेतक-यांसाठी राज्य सरकारनं काल सात हजार कोटी रुपयांचं पॅकेज जाहीर केलं आहे. वैध सावकारांकडून घेतलेलं कर्जही सरकारच फेडणार आहे. तसंच तीन महिन्यांचं वीजबिल भरायची घोषणाही सरकारनं केली आहे. परंतु, हे पॅकेज विरोधकांना पटलेलं नाही. त्यावरूनच, काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आमदारांनी विधानसभेत प्रश्‍नोत्तरांच्या तासांत गदारोळ केला. त्यांच्या घोषणाबाजीमुळे १५ मिनिटांसाठी कामकाज तहकूब करावं लागलं. त्यानंतरही हा गोंधळ थांबला नाही. विरोधक हौद्यात उतरून नारेबाजी करत होते. त्यात जितेंद्र आव्हाड आघाडीवर होते. तेव्हा, कामगार मंत्री प्रकाश मेहता आणि त्यांच्यात खटका उडाला. मुख्यमंत्र्यांचं निवेदन सुरू असतानाच त्यांच्यात वादावादी सुरू होती. त्यात आव्हाड यांनी असंसदीय शब्द वापरला. तो ऐकून विधिमंडळ कामकाजमंत्री गिरीश बापट यांनी त्यांच्या निलंबनाचा प्रस्ताव मांडला. त्याला सत्ताधा-यांनी एकमुखानं पाठिंबा देताच, विधानसभाध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी हिवाळी अधिवेशन होईपर्यंत आव्हाडांना निलंबित केले.
या कारवाईचा निषेध करत काँग्रेस-राष्ट्रवादी आमदारांनी सभात्याग केला. निलंबन रद्द होईपर्यंत कामकाजात सहभागी न होण्याचा निर्धार त्यांनी केला आहे.
 सौजन्‍य :  महाराष्‍ट्र टाईम्स 
 
Top