बार्शी - मराठवाड्याचे प्रवेशद्वार म्हणून बार्शी तालुक्याला ओळखले जाते. बार्शी तालुक्याचा समावेश पश्‍चिम महाराष्ट्र या विभागामध्ये होत असला तरी तालुक्याची भौगोलिक रचना, पर्जन्यमान, तापमान व ऐनवेळी तयार होणारे वातावरण मराठवाड्याप्रमाणेच आहे. तद्वत, बार्शी तालुकाही दुष्काळाच्या उंबरठय़ावर येऊन ठेपला असल्याचे सांगण्यात येते.
          सध्या विदर्भासह मराठवाड्यामध्ये दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी उपाययोजना करण्याचे काम युध्दपातळीवर सुरु आहे. राज्यातील १९ हजार ५९ गावांमध्ये टंचाईच्या सर्व योजना राबविण्यात येणार आहेत. यंदाच्या दुष्काळाची तीव्रता केवळ विदर्भ आणि मराठवाड्यावरच पसरलेली नसून पश्‍चिम महाराष्ट्रातील अनेक तालुक्यावरही पसरलेली आहे, असे असताना सध्या केवळ दोन विभागांचाच विचार करण्यात येत असल्याचे दिसून येत आहे.
           ज्या मराठवाड्याचे प्रवेशद्वार म्हणून बाश्री तालुक्याला ओळखले जाते. त्या बाश्री तालुक्यात सलग दुसर्‍या वर्षी दुष्काळी स्थितीचा सामना करावा लागत आहे. यावर्षी तर सरासरीच्या आसपासही पाऊस पडला नाही. त्यामुळे पाणी जमिनीमध्ये मुरलेच नाही. परिणामी पाणीपातळीत पुरेशी वाढ होऊ शकली नाही. अपुर्‍या पर्जन्यमानामुळे येत्या महिन्याभरात पाणीटंचाईचे भीषण संकट तालुक्यापुढे उभारणार आहे. कसे-बसे खरिपाचे उगवलेले पीक अवकाळी पावसाने वाया तर गेलेच. पण, उत्पादनापेक्षा उत्पादन खर्चच अधिक झाला. त्यामुळे आधीचआर्थिक संकटामध्ये सापडलेल्या शेतकर्‍याला पावसानेही हुलकावणी दिल्याने सार्‍या आशा शासनाच्या निर्णयाकडे लागून राहिल्या आहेत.
              मराठवाड्याचे प्रवेशद्वार बाश्री तालुका असल्याने दारात दुष्काळ नाही आणि घरात दुष्काळ आहे, असा जावईशोध शासनाच्या यंत्रणांनी लावल्याचे दिसून येत आहे. बाश्री तालुक्यामध्ये पावसाचे पाणी वाहून येताना ते उस्मानाबाद जिल्ह्यातूनच वाहत येते. तालुक्याला बालाघाटच्या डोंगररांगाची सिमारेषा लागली असली तरी भूम,परंडा, उस्मानाबाद, तुळजापूर हे तालुके लागूनच आहेत. ज्यावेळी या तालुक्यामध्ये पाऊस पडेल. त्यावेळी बाश्री तालुक्यातील धरणांमध्ये पाणी वाहून येते व ते भरतात यावर्षी एकही धरण भरलेले नाही. अपुरा पाऊस, अपुरे पाणी असतानाही बाश्री तालुक्याचा दुष्काळी परिस्थितीमध्ये समावेश करण्यात आलेला नाही.
                 उस्मानाबाद जिल्ह्यामध्येच पावसाचे प्रमाण यंदा कमी राहिले; त्याच धर्तीवर बाश्री तालुक्यातही पावसाचे प्रमाण कमीच राहिले तरीही उस्मानाबाद जिल्ह्याला दुष्काळी उपाययोजनांचा लाभ मिळणार आहे. मग बाश्री तालुक्याला नाही, असा सवाल जाणकार मंडळी उपस्थित करीत आहेत. यंदा बाश्री तालुक्यासह सोलापूर जिल्ह्यामध्ये दुष्काळाची तीव्रता आहेत. बाश्री तालुक्यासह सोलापूर जिल्ह्यामध्ये दुष्काळाची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे. अपुर्‍या पर्जन्यमानामुळे खरीप आणि रब्बी हे दोन्ही हंगाम बाधित झाले आहेत. त्यामुळे शेतकर्‍यांना मोठय़ा नुकसानीला सामोरे जावे लागणार आहे. फळबागायतदार शेतकर्‍यांचे यामध्ये मोठे नुकसान झाले आहे. परतीच्या पावसाने ज्वारी पिकाला काही प्रमाणात दिलासा दिला असला तरी पेरणी क्षेत्र घटले आहे. याशिवाय ज्वारीवर चिकटा रोगाचा प्रादुर्भाव होऊ लागला आहे. येत्या काळात नुकसानीची आणखी तीव्रता वाढणार असून ग्रामस्थांना पिण्याचे पाणी, जनावरांच्या चार्‍याचा प्रश्न आदी प्रश्न गंभीर स्वरुप धारण करण्याची दाट शक्यता आहे.  पाणीपुरवठय़ाच्या वेळा निश्‍चित कराव्या लागणार  कमी पावसाचा सर्वांधिक फटका गावोगावातील पाणीपुरवठा योजनांना बसणार आहे. कमी पाण्यामुळे पाणी पुरवठय़ाच्या वेळा निश्‍चित कराव्या लागणार आहे. विशेष म्हणजे, सदर पुरवठय़ावर र्मयादाही घालाव्या लागणार आहेत. मात्र, कुणालाही आवश्यकतेपेक्षा कमी पाणी पडू देणार तर नाहीत, शिवाय प्रशासनाच्या मदतीने शक्य तसे, गरजेप्रमाणे पाणी उपलब्ध करुन पाण्याचे नियोजन केले जाईल.
    - अंकुश काटे/ महेश पन्हाळे
 
Top