उस्मानाबाद - ग्रंथ हा निर्जीव असतील माणूसकीला सजीव करण्याचे काम ग्रंथ करतो. ग्रंथ वाचनामुळे संवाद व विचार माणूसकीला जागे करण्याचे कार्यही ग्रंथ करतात. ग्रंथ व साहित्याने माणूसकीची जपवणूक होते. ग्रंथाने माणूस घडविण्याचे काम करतो. ग्रंथाचे वाचन करतांना लेखकांनी सांगितलेल्या गोष्टी महत्वाच्या असून त्या ग्रंथामधील भावना महत्वाच्या आहेत. समाज जडणघडण करण्याचे काम साहित्य करते. माणूसकीचे मूल्य जोपासणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन ख्यातनाम ग्रामीण कथाकार प्रा. भास्कर चंदनशिव यांनी  केले.
राज्य शासनाचा मराठी भाषा विभाग, साहित्य व संस्कृती मंडळ आणि माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने आयोजित ग्रंथोत्सव-2015 या पुस्तक प्रदर्शन आणि विक्री उपक्रमाचे उदघाटन प्रा. चंदनशीव यांच्या हस्ते येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सांस्कृतिक सभागृहात झाले. त्यावेळी ते बोलत होते. मराठवाडा साहित्य परिषद, उस्मानाबाद शाखेचे अध्यक्ष नितीन तावडे, जिल्हा माहिती अधिकारी दीपक चव्हाण, जिल्हा ग्रंथालय अधिकारी  गजानन कुरवडे यांची व्यासपीठावर उपस्थिती होती. यावेळी बालवाचकांचे प्रतिनिधी म्हणून विद्यार्थी आणि विद्यार्थिंनीची उपस्थिती होते.  
सुरुवातीला प्रा.चंदनशीव यांच्या हस्ते ग्रंथप्रदर्शनाचे फीत कापून उदघाटन करण्यात आले. यावेळी ग्रंथप्रकाशक, ग्रंथविक्रेते, विविध शाळा-महाविद्यालयांचे प्रतिनिधी, साहित्य संस्थांचे पदाधिकारी, प्रसारमाध्यम प्रतिनिधी आदींची उपस्थिती होती. त्यानंतर मान्यवरांनी ग्रंथोत्सवातील ग्रंथदालनाची पाहणी केली.
यावेळी बोलताना प्रा.चंदनशीव म्हणाले की, ग्रंथ हे आमचे गुरु आहेत. ग्रंथाच्या वाचनामुळे माणूस घडतो. ग्रंथामुळे समाजकारण, राजकरण, अर्थकारणांसारखे महत्वाचे प्रश्न सोडविण्यास मदत होते. प्रत्येक शब्द हा संस्कृती घेऊन येतो. त्यामुळे साहित्यिक नवीन भाषा निर्माण करण्याचे कार्य करतात. ग्रंथामुळे मानवी मुल्यांचे संवर्धन होते असे सांगून त्यांनी उपस्थितीत  विद्यार्थ्यांना संवाद भाषेतून बोलणे, हीच संवादाची परिभाषा असल्याचे नमूद केले. 
ग्रंथ सर्वसामान्यांच्या मनाची भाषा बोलतात. ही भाषा अक्षराच्या माध्यमातून पोहोचविण्याचे काम ग्रंथ करतात. विद्यार्थ्यांना बाल कविता व गोष्टी सांगून मंत्रमुग्ध केले. साहित्यांचे वाचन निरंतर करण्याचे  आवाहन त्यांनी यावेळी केले.  
जिल्हा माहिती अधिकारी चव्हाण  म्हणाले की, या उपक्रमाव्दारे  वाचकांपर्यंत पुस्तके पोहोचविण्याचा शासनाचा उद्देश असून  वाचकांनीही या उपक्रमाला सकारात्मक प्रतिसाद दयावा. गतवर्षीप्रमाणे यंदाही  उस्मानाबादकर साहित्य रसिक भरभरुन प्रतिसाद देतील,अशी अपेक्षा व्यक्त करुन  त्यांनी ग्रंथप्रदर्शन आयोजनामागील भूमिका स्पष्ट  केली. 
सुरुवातीस सकाळी रामकृष्ण परमहंस महाविद्यालय, व्यंकटेश महाजन महाविद्यालय,श्रीपतराव भोसले हायस्कूल, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था ( डायट), तेरणा कॉलेज, छत्रपती शिवाजी हायस्कूल आणि सरस्वती हायस्कूल,उस्मानाबाद येथून ग्रंथ दिंडी काढण्यात आली. या ग्रंथदिंडीस शाळा महाविद्यालयांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या ग्रंथदिंडीत विद्यार्थी-विद्यार्थिंनींचा सहभाग लक्षणीय होता. सकाळीच या विद्यार्थ्यांनी स्टॉल्सला भेटी दिल्या. विशेष म्हणजे रविवारी दिवसभर पाऊस सुरु असतानाही बाहेरुन ग्रंथप्रकाशन आणि विक्रेते या ग्रंथोत्सवासाठी आले आहेत. 
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार बालाजी तांबे यांनी केले. या कार्यक्रमास उस्मानाबाद जिल्ह्यातील साहित्य रसिक, वाचक, ग्रंथप्रेमी नागरिक,  पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
Top