वैराग (महेश पन्हाळे) : बार्शी तालुक्यामध्ये झालेल्या अवकाळी पाऊस, गारपीट आणि वादळी वार्‍याचा सर्वाधिक फटका द्राक्ष बागांना बसला असून कृषी विभागाने तालुक्यातील तेरा गावांचा प्रत्यक्ष पंचनामा करण्यास सुरुवात केली आहे. दहा तारखेला दोन वेळा अवकाळी पावसाने तडाखा दिल्याने सुमारे ४८ तासानंतर द्राक्ष पिकांचे नुकसान दिसू लागले असून घडच्या घड नासू लागल्याने द्राक्ष बागायतदाराना मोठा आर्थिक नुकसान सहन करावा लागत आहे.
          नुकतेच अवकाळी पावसाच्‍या  फटक्याने द्राक्ष बागायतदार  
उध्दवस्त झाल्‍याचे दिसत आहे. तालुक्यात एकूण १२३0 हेक्टर क्षेत्रावर द्राक्षबाग पसरली असून यापैकी केवळ २00 ते ३00 हेक्टर क्षेत्रावरीलच द्राक्ष बाग विक्रीस गेली आहे. तर सुमारे ४00 ते ५00 हेक्टर क्षेत्रावरील द्राक्षबाग फवारणी करुन ताळ्यावर आणण्याचा प्रयत्‍न शेतकरी करीत आहेत. सुमारे १00 हेक्टरवरील द्राक्षे बेदाण्यासाठी गेली असून सध्या बेदाणा प्रक्रिया सुरु आहे. मात्र हवेतील आद्रता वाढल्याने बेदाणा काळा पडून कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे तर सुमारे ४00 हेक्टर क्षेत्रातील द्राक्षेला अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा जोरदार तडाखा बसल्याने द्राक्षमणी फुटले आहेत. हे मणी फुटून कुजण्याची प्रक्रिया सुरु झाली असून घडच्या घड उद्ध्वस्त होऊ लागले आहेत. परिणामी पांढरी माशीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता बळावली आहे. वार्‍याच्या प्रचंड वेगाने बागातील वेलींचे मोठे नुकसान झाले असून घडांना गारांचा मारा लागल्याने इजा पोहचली आहे. परिणामी ४८ तास ओलांडून गेल्याने घड कुजण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. त्यामुळे सध्या सुरु झालेल्या पंचनाम्यातील प्राथमिक अंदाज चुकण्याची शक्यता असून द्राक्ष पिकांचे नुकसान दिवसेंदिवस वाढत जाण्याची भिती द्राक्ष बागायतदारांनी व्यक्त केली आहे. विक्रीला आणेपर्यंत एकरी सुमारे दोन लाखापर्यंत बागायतदारांना खर्च करावा लागत असून आत्ताच्या अवकाळी पावसामुळे त्यांचे हे सारेच नुकसान झाले आहे. पावसामुळे भिजलेल्या घडावर फवारणी करण्यासाठी सध्या सुमारे पंधरा-पंधरा हजार खचरून फवारणी तर पाच हजार रुपये खर्च करुन (प्रती एकरी) घडाची साफसफाई करावी लागत आहे. १0 मार्चच्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीने घायाळ झालेल्या शेतकर्‍यांना पुन्हा १४ व १६ मार्च या रोजीही अवकाळी पाऊस कोसळणार असल्‍याची शक्यता हवामान खात्याने वर्तवल्याने सध्याची बाग व्यवस्थित करुन येणार्‍या आव्हानाचा सामना करण्यासाठी सज्ज राहायचे आहे.
तेरा गावात पंचनामे सुरू 
हिंगणी (पा), जामगाव (पा), पिंपरी (पा), पिंपरी (आर), मळेगाव, कापसी सावरगाव, इंदापूर, तांबेवाडी, नारी, भातंबरे, गुळपोळी, 
गेल्या तीन वर्षांपासून अवकाळी पावसाचा फटका द्राक्ष बागांना बसत असून त्याचा विमा शासनाने उतरावावा आणि १ ऑक्टोबर ते ३0 एप्रिल अशी मुदत ठेवावी. पंचनामे त्वरित करुन आर्थिक मदतीचा आधार द्राक्ष बागायतदारांना द्यावा.
- राजकुमार शेळके, द्राक्ष बागायतदार

अवकाळी पावसाने वाफे भरले, घडावर पाणी साठले, गारांनी मणी फुटले. त्यामुळे बुरशी निर्माण होऊन पांढर्‍या माशीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. तरी यावरती प्रतिबंधात्मक उपाय करावेत. पंचनामे सुरु असून प्रत्येक नुकसानग्रस्त शेतकर्‍यांचा पंचनामा करण्यात येईल. - श्रीधर जोशी, तालुका कृषी अधिकारी
सध्या पंचनामा करण्यास सुरुवात झाली असून नुकसानीचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे निश्‍चित नुकसान सांगू शकत नाही. तरीही पंचनामे पारदर्शकपणे पूर्ण करण्यात येतील. - आर.सी. चापले, कृषी सहाय्यक बार्शी 

 
Top