उस्मानाबाद : बावीस वर्षीय अनोळखी तरूणीचा गळा चिरून तिचे प्रेत पोत्यात टाकून विहिरीत फेकल्याची खळबळजनक घटना आज दि. २१ डिसेंबर रोजी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास उस्मानाबाद तालुक्यातील वाघोली येथे उघडकीस आली आहे.
उस्मानाबाद तालुक्यातील वाघोली येथील गावच्या सार्वजनिक पाणी पुरवठा विहिरीजवळ अरूण केशव पिंपळे हे नेहमी प्रमाणे आपल्या शेतात गेले असता पाणी पुरवठा विहिरीत कांही तरी असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी याबाबत गावात माहिती दिल्यानंतर विहिरीतुन ते पोते बाहेर काढण्यात आले. त्यावेळी या पोत्यामध्ये एका तरूणीचा मृतदेह आढळून आला. सदरील आरोपीकडून पुरावा नष्ट करण्यासाठी या तरूणीचे प्रेत पोत्यात बांधुन विहिरीत टाकले आहे. सदर तरूणीचा गळा चिरून खुन करून तिचे प्रेत विहिरीत टाकल्याचे निदर्शनास आले. घटनेची माहिती मिळताच विभागीय पोलिस अधिकारी टिपरे यांच्यासह ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक गावडे यांनी घटनास्थळी धाव घेतली.
मयत तरूणीची उंची ५.५ असुन अंगावर जांभळट कलरची पँट, जांभळट लाल फुली असलेला टॉप आहे. या तरूणीची ओळख रात्री उशिरापर्यंत पटलेली नव्हती. दरम्यान पोलिसांनी समोर असलेल्या परिस्थितीवरून व अरूण केशव पिंपळे यांनी दिलेल्या माहितीवरून उस्मानाबाद ग्रामीण पोलिस ठाण्यात अज्ञाताविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच या प्रकरणाचा तपास ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक गावडे करीत आहेत. वाघोली येथील ही घटना ऐकून सर्वत्र खळबळ उडाली आहे.