उस्मानाबाद - तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग येथे नगरपालिका प्रशासनाने अतिक्रमण मोहिमेच्या नावाखाली बौध्दनगर येथील सर्व्हे नं. २९ मधील पन्नास वर्षापासून वास्तव्य करणा-या बंजारा (लमाण) व दलित समाजाची घरे उध्दवस्त केली असून बेघर झालेल्या कुटूंबियांचे पुनर्वसन पूर्वी राहत असलेल्या ठिकाणीच करावी, अशी मागणी उस्मानाबाद जिल्हाधिका-यांना बेघर कुटूंबियांच्यावतीने निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. 

नळदुर्ग नगरपरिषदेकडून अतिक्रमण काढून बेघर केलेल्या लोकांचे पुनर्वसन करण्यासाठी जिल्हा प्रशासन स्तरावरुन व न.प. नळदुर्ग यांच्या स्तरावरुन हालचाली चालू आहे. बेघर झालेल्या निर्वासितांना पुनवर्सन करण्यासाठी नळदुर्ग शहरातील तयार झालेले घरकुल मध्ये (जे की, घरकुल प्रकरण सध्या उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल असल्याने न्याय प्रविष्ठ आहे) किंवा वसंतनगर, शिवकरवाडी येथील शासकीय जमिनीवर पुनर्वसन करण्याचे प्रयत्न चालू आहे. परंतू बेघर कुटूंब पन्नास वर्षापासून ज्या ठिकाणी राहत होते त्याचठिकाणी प्रशासनाच्या सर्व तांत्रिक बाबी पूर्ण करुन त्याच ठिकाणी पुनर्वसित करण्यात यावे, असे नमूद करुन जेणेकरुन आमच्या दैनंदिन गरजा जे की, आमच्या मुलांना शिकण्यासाठीची शाळा, तसेच बसस्थानक, बाजारपेठ, दवाखाने अशा सर्व बाबीने ही जागा सोयीयुक्त आहेत. तसेच गेल्या पन्नास वर्षापासून आम्ही याच ठिकाणी राहत असल्याने शासनाच्यावतीने अतिक्रमणधारकांनी ज्या ठिकाणी अतिक्रमण केले आहे त्याच ठिकाणी कायम करावे, असे अनेक शासनाच्या परिपत्रकानुसार आम्ही त्या नियमात बसत आहोत. त्यासाठी आम्ही वेळोवेळी शासन दरबारी पाठपुरावा केलेले आहेत. तरीही शासनाच्या काही तांत्रिक बाबींमुळे प्रशासनाने आमची दखल घेतली नाही. म्हणून आम्ही आमच्या मालकी हक्कापासून वंचित राहिलो. केवळ शासनाच्या दुर्लक्षित पणामुळे आमच्यावर अतिक्रमणाचा हा आघात झालेला असून त्यामुळे आम्ही आज बेघर होवून रस्त्यावर आल्याचे सांगून इतर कुठल्याही जागेवर आमचे पुनर्वसन करण्यात येणार असेल तर ते आम्हाला मान्य नसून ज्या जागेवरुन बेघर करण्यात आले त्याच जागेवर शासकीय पातळीवरील तांत्रिक बाबींची अडचण दूर करुन आमचे पुनर्वसन करावे, असेही निवेदनात म्हटले आहे. निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी घुगे यांना देण्यात आले. यावेळी गोरसेनेचे उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष राजाभाऊ पवार, सचिव बालाजी राठोड, कार्याध्यक्ष दिलीप आडे, तालुकाध्यक्ष संतोष पवार, तालुका सहसचिव मोहन राठोड, रामदास आडे, सचिन राठोड, विकास जाधव, राजाराम नाईक, अशोक बंजारे, राम नाईक, शिवाजी नाईक आदीजण उपस्थित होते. 

या निवेदनाची एक प्रत माहितीस्तव पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसुल मंत्री एकनाथ खडसे, विभागीय आयुक्त औरंगाबाद, उस्मानाद पालकमंत्री डॉ. दीपक सावंत, भारतीय बंजारा क्रांती दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष मोरसिंग भाई राठोड, खासदार रविंद्र गायकवाड, आ. मधुकरराव चव्हाण, तुळजापूर तहसिलदार, रिपाइंचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ ओव्हाळ आदींना पाठविण्यात आल्या आहेत. या निवेदनावर शिवाजी नाईक, राजाराम नाईक, लालूबाई जाधव, सुधाकर नाईक, अशोक बंजारे, जिजाबाई नाईक, सिताबाई राठोड यांच्यासह ४५ जणांच्या स्वाक्ष-या आहेत.
 
Top