नळदुर्ग :- निवडणुका, आश्‍वासन आणि विजय यानंतरच्‍या कालावधीत कुठलाही उमेदवार आपल्‍या मतदारसंघात फिरकतो अशा घटना अपवादानेच घडतात. काही उमेदवार दिलेल्‍या आश्‍वासनापैकी पाच वर्षात एखादेच आश्‍वासन पुर्ण करताना दिसून येतात. जि.प. निवडणुकीच्‍या निकालास महिना उलटण्‍यापूर्वी उस्‍मानाबाद जिल्‍ह्यातील नंदगाव जि.प. गटातून विजयी झालेले *राष्‍ट्रवादीचे महेंद्र धुरगुडे* यांनी आपल्‍या कामाचा ठसा उमटवत तमाम राजकीय पदाधिका-यापुढे मतदारांच्‍या अपेक्षापुर्ती कशी केली जाते याचे सकरात्‍मक उदाहरण आपल्‍या कार्यातून दाखवून दिले आहे. त्‍यामध्‍ये एका विद्यार्थ्‍यास उज्‍वल भवितव्‍यासाठी मदत केली तर दुस-या घटनेत विद्यार्थ्‍याच्‍या मृत्‍यू पश्‍चात कुटुंबियास अनमोल मदत मिळवून दिली.

महिनाभरापूर्वी जिल्‍हापरिषद निवडणुकीत नंदगाव गटासाठी मूळचे मंगरुळ (ता. तुळजापूर) येथील रहिवाशी असलेले मात्र काक्रंबा गटातील जि.प. सदस्‍य असलेले राष्‍ट्रवादीचे महेंद्र धुरगुडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल करताच गेटकेन उमेदवार म्‍हणून त्‍यांच्‍यावर विरोधकाकडून टीका करण्‍यात आली. मात्र यापूर्वी सलग दोनदा जिल्‍हापरिषदेमध्‍ये आपल्‍या कामाची चुणूक दाखविणारे धुरगुडे यांनी न डगमगता नेटाने प्रचार करत विजयश्री खेचून आणल्‍याच्‍या घटनेला महिना होत आहे. निवडणुक प्रचाराच्‍या दरम्‍यान नंदगाव गटातील अनेक ठिकाणी नागरिकांशी थेट संवाद साधत अडचणी सोडविण्‍याचे आश्‍वासन दिले.

नंदगाव जि.प. गटातील बोळेगाव येथील खंडू रुपनर या विद्यार्थ्‍याचा अपघातामध्‍ये एक डोळा निकामी झाला होता. या अपघातामुळे खंडूने सार्वजनिक जीवनातून स्‍वतःस वेगळे करत घराबाहेर पडणे बंद केले होते व तो काळा चश्‍मा वापरत असे. प्रचारादरम्‍यान धुरगुडे यांना ही घटना समजली. यावेळी त्‍यांनी खंडूच्‍या डोळ्यावर उपचार करण्‍याचे आश्‍वासन दिले आणि विजयानंतर महिनाभरातच आश्‍वासनपूर्ती करत पुणे येथील डोळ्याच्‍या दवाखान्‍यात खंडू वर उपचार केले. तेथेच न थांबता धुरगुडे यांनी त्‍याच्‍या  पुढील शिक्षणाची जबाबदारी घेत आपल्‍या कंपनीमध्‍ये काम करण्‍याची संधी दिली. सध्‍या खंडू आत्‍मविश्‍वासाने वावरत आहे. तसेच नंदगाव येथील जि.प. शाळेस धुरगुडे यांनी भेट दिली असता शाळेतील बसवराज मिनजगे हा विद्यार्थी सन 2013 मध्‍ये सर्पदंशाने मयत झाल्‍याचे व त्‍या विद्यार्थ्‍याच्‍या  कुटूंबियास शासकीय मदत मिळाली नसल्‍याचे समजले. धुरगुडे यांनी तात्‍काळ पाठपुरावा करत जिल्‍हाधिका-यांची भेट घेवून राजीव गांधी सानुगृह योजनेतून 75 हजार रुपयाचा धनादेश पिडीत मुलाच्‍या कुटूंबियास सुपूर्द केला. विशेष म्‍हणजे वरील दोन्‍ही घटना या एकाच महिन्‍यात घडल्‍या आहेत.
 
Top