उस्मानाबाद : परंडा तालुक्यात सिना, खैरी,उल्फा, चांदणी या नद्या असून या नद्यांच्या पात्रांमध्ये लहान मोठ्या प्रमाणात वाळूसाठा आहे. तांदुळवाडी,खासगाव, सोनगिरी, रुई दुधी, भोत्रा,  देवगाव, वडनेर या वाळूगटातून अनधिकृतपणे वाळू उपसा व वाहतुकीच्या  प्रकरणाबाबत वारंवार तक्रारी, संदेश प्राप्त होत आहेत.अवैध वाळू चोरी वाहतुकीमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी नदीपात्रात वाहनाने प्रवेश करण्यास प्रतिबंध करण्यासाठी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 लागू करण्याबाबत उपविभागीय दंडाधिकारी डॉ.स्वप्नील मोरे यांनी त्यांच्या अधिकारानुसार 21 सप्टेंबर रोजी सकाळी 6 ते दिनांक 20 ऑक्टोबर रोजी रात्री 12.00 वाजेपर्यंत परंडा तालुक्यातील मौजे तांदुळवाडी, खासगाव, सोनगिरी,भोत्रा देवगाव, वडनेर,शेळगाव, चिंचपूर या गावातील नदीपात्रामध्ये किंवा वाळू गटाच्या ठिकाणी वाहनाने प्रवेश करण्यास, अवैध उत्खनन करण्यास तसेच वाहतूक करण्यास प्रतिबंध केला आहे.

हा आदेश लागू असलेल्या कालावधीत कोणतेही वाहन जसे जेसीबी, पोकलेन, ट्रक,ट्रॅक्‍टर व इतर, मजूर, ठेकेदार, वाहनचालक व अन्य चार चाकी वाहन व व्यक्तीस प्रतिबंधित ठिकाणी प्रवेश करता येणार नाही. हा आदेश शासकीय कर्तव्यावरील महसूल अधिकारी -कर्मचारी,पोलीस अधिकारी-कर्मचारी किंवा उपविभागीय दंडाधिकारी कार्यालयाने तसेच तहसील कार्यालय, परंडा यांनी नियुक्त केलेल्या पथकास तसेच त्यांच्या वाहनास लागू होणार नाहीत, याची नागरिकांनी नोंद घ्यावी, असे उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी डॉ. स्वप्नील मोरे यांनी कळविले आहे.
 
Top