जिल्‍हाधिकारी राधाकृष्ण गमे

उस्मानाबाद :

कुष्ठरोग शोध अभियान 2018- 2019 मधील  जिल्हा समन्वय समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच पार पडली. या बैठकीमध्ये कुष्ठरोग शोध मोहिमेमध्ये दि. 24 सप्टेंबर ते 9 ऑक्‍टोबर 2018 या कालावधीत घरोघर तपासणीसाठी येणाऱ्या आशा व स्वयंसेवक यांना तपासणीसाठी नागरिकांनीही सहकार्य करावे व सर्वांनी आपली तपासणी करून घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री. गमे यांनी केले आहे.

जिल्हाधिकारी श्री. गमे यांनी जिल्ह्यात कुष्ठरोग शोध अभियान यशस्वी करून जास्तीत जास्त संशयित रुग्ण शोधून काढावेत व शोधलेल्या सर्व संशयितांची वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मोहीम चालू असतानाच तपासणी करावी तसेच उर्वरित संशयितांची तपासणी करण्यासाठी केंद्रनिहाय तपासणीचे नियोजन करावे, सर्व संशयित रुग्णांच्या तपासणीनंतर कुष्ठरोगाचे निदान निश्‍चित झालेल्या सर्व नवीन कुष्ठरुग्णांना त्वरित उपचार सुरू करावेत, अशा सूचना दिल्या. त्याचबरोबर लहान मुले रुग्ण सापडल्यास त्यांच्या सर्व सहवासितांची तपासणी करुन खात्री करावी, असेही त्यांनी सांगितले.

या मोहिमेसाठी 1 हजार 327 पथकांचे नियोजन करण्यात आले आहे. प्रत्येक पथकामध्ये आशा किंवा महिला कर्मचारी व एक पुरुष स्वयंसेवक असे एकूण 2 हजार 654 जण काम करणार आहेत, 265 आरोग्य कर्मचारी पर्यवेक्षक म्हणून काम करणार आहेत. प्रत्येक पथक दर दिवशी ग्रामीण भागांमध्ये 20 व शहरी भागांमध्ये 25 घरांमध्ये जाऊन घरातील सर्व व्यक्तींची तपासणी करणार आहेत.तपासणी दिनांक 24 सप्टेंबर ते 9 ऑक्‍टोबर 2018 या कालावधीत म्हणजेच 14 दिवसात पूर्ण करण्यात येणार आहे. मागील वर्षी दिनांक 5 सप्टेंबर  ते 23 सप्टेंबर 2017 या कालावधीत ही मोहीम जिल्ह्यात सर्वत्र राबविण्यात आली होती. यामध्ये एकूण 7 हजार 823 संशयित रुग्ण शोधण्यात आले होते. त्यांची तपासणी करून त्यांना 193 नवीन कुष्ठरोगाचे निदान निश्चित करून त्यांना एम. डी. टी. उपचार सुरू केले.

या बैठकीत प्रास्ताविक सहाय्यक संचालक  (कुष्ठरोग) डॉ. डी. एस. खडके यांनी केले तसेच मोहिमेची सविस्तर माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. वडगावे यांनी दिली. या बैठकीसाठी जिल्हा क्षयरोग अधिकारी श्री. सोपल , जिल्हा हिवताप अधिकारी श्री.बोरकर,  जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक डॉ. गरड, शिक्षणाधिकारी  (माध्यमिक) शिवाजी चंदनशिवे तसेच आशा समन्वयक हजर होते.

 
Top