लोहारा : इकबाल मुल्ला
छत्रपती शिवाजी महाराजांनी बाराबलुतेदारांना सोबत घेऊन भक्ती आणि शक्ती ही कल्पना स्वराज्य निर्मितीसाठी राबवली होती. त्यामुळे भक्ती आणि शक्तीचे नाते घट्ट झाले पाहिजे, असे प्रतिपादन खासदार छत्रपती संभाजी महाराज यांनी केले.
लोहारा तालुक्यातील माकणी येथील संत शिरोमणी मारुती महाराज पुण्यतिथीनिमित्त अखंड हरिनाम सप्ताह कार्यक्रमास मंगळवारी (दि.२५) त्यांनी भेट दिली. यावेळी ते बोलत होते.
यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राधाकृष्ण गमे, भाजपा नेते सुधीर पाटील, भाजपा मीडीयाचे जिल्हाप्रमुख धनंजय रणदिवे, हभप महेश महाराज माकणीकर, उपविभागीय अधिकारी विठ्ठल उदमले, पोलीस निरिक्षक सर्जेराव भंडारे, संभाजी महाराजांचे स्वीय सहाय्यक योगेश केदार, तहसिलदार राहुल पाटील, भाजपा तालुकाध्यक्ष सत्यवान सुरवसे, जिप सदस्य ज्ञानदेव राजगुरु, दत्ता सोनटक्के आदींची उपस्थिती होती.
पुढे बोलताना छत्रपती संभाजी महाराज म्हणाले, शक्ती आणि भक्ती ही कल्पना आजची नाही. छत्रपती शिवाजी महाराजांपासूनची ही कल्पना आहे. स्वराज्य निर्मितीसाठी त्यांनी त्यावेळी तुकाराम महाराज आणि वारकºयांच्या माध्यमातून प्रयत्न केले. मध्यंतरीच्या काळात हा प्रयत्न कमी झाला. त्यानंतर अलीकडच्या काळात महेश महाराज यांच्याकडून प्रयत्न होत आहेत. लहान वयात त्यांनी वारकरी सांप्रदायाच्या माध्यमातून लोकांना जोडले आहे. त्यामुळे त्यांच्याकडे भक्ती आहे तर शक्तीसाठी मी त्यांना कधीच कमी पडणार नसल्याचे त्यांनी सांगितले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावात किती ताकद आहे, हे सांगताना त्यांनी दिल्ली येथे शिवजयंतीनिमित्त काढण्यात शिवाजी महाराजांच्या रथाची राष्ट्रपती, लष्करप्रमुख यांच्यासह देशभरातील अनेकांनी दखल घेतली आहे. आज समाजात दलित, लिंगायत, मराठा अशी दरी निर्माण झाली आहे,मात्र समाजासाठी हे घातक आहे. त्यासाठी सर्व जातीतील लोकांना एकत्र आणण्याची ताकत ही सांप्रदायात आहे. त्यामुळे महेश महाराजांनी आपण बहुजनांचे वंशज ही ओळख निर्माण करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहनही केले.
यावेळी जिल्हाधिकारी गमे यांनी आज भक्ती आणि शक्तीचा योग असून त्याचे हे काम पुढे नेहण्यासाठी आपण प्रयत्न करुयात. त्यासाठी प्रशासनाची मदत करुत. अलीकडच्या काळात व्यसनाधिनतेचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. मग ते मोबाईल वापराचेही व्यसन लागले आहे. ही सर्व व्यवसने दूर करण्यासाठी वारकरी सांप्रदायाशिवास पर्याय नसल्याचे त्यांनी सांगितले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संभाजी महाराजांचे स्वीय सहाय्यक योगेश केदार यांनी तर आभार महेश महाराज यांनी मानले. यावेळी पंचक्रोशीतील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

