उस्मानाबाद : 1993 च्या प्रलयंकारी भूकंपात अनाथ, निराधार झालेल्या मुला मुलींचे संगोपन व शिक्षण करण्यासाठी राष्ट्र सेवा दलाने साने गुरुजी जयंती दि. 24 डिसेंबर 1993 रोजी नळदुर्ग ता. तुळजापूर येथे आपले घर चालू केले. निवास भोजन व शिक्षण यांची  चांगली सोय करण्याबरोबरच त्या मुला मुलींच्या सर्वांगीण विकासाला उत्तेजन मिळावे आणि त्यांनी स्वतःच्या पायावर उभे राहून चांगल्या प्रकारे त्यांना जगता यावे,अशी त्यांची तयारी करण्याचा कटाक्ष आपले घर ने नेहमीच ठेवला आहे. अशा निराधार मुली मुलांचे जीवन वाया जाऊ नये,यासाठी आपले घर सुरू राहणे गरजेचे आहे.

दहावीपासून बाहेर पडलेल्या विद्यार्थ्यांच्या जागी नवीन मुले मुली येतात. बारा ते पंधरा स्त्री-पुरुष कार्यकर्त्यांचा संच आत्मीयतेने आपले घरचे कार्य सांभाळत आहेत. आपले घर मधून शिक्षण घेऊन बाहेर पडलेल्या सुमारे 1500 विद्यार्थ्यांचा आपले घर शी सदैव संपर्क आहे, त्यांच्यापैकी जे नळदुर्गच्या जवळ राहतात ते आपल्या घरच्या कामकाजात आपुलकीने भाग घेतात. समाजातील दानशूर धनिक वर्गाबरोबरच शिक्षक, प्राध्यापक, सेवारत व निवृत्त सरकारी कर्मचारी, बँका वगैरेचे कर्मचारी यांनी या सामाजिक बांधिलकीचे ऋण मानून किमान 2 हजार 500 रुपयांची देणगी आपले घर च्या पत्त्यावर पर्यायाने या अनाथ निराधार मुला-मुलींकरिता द्यावी, ही विनंती आपले घर च्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.

ही देणगी कर 80 जी आर या सवलतीस पात्र आहे.(आपले घर च्या राष्ट्रसेवा दल आपले घर स्टेट बँक ऑफ इंडिया नळदुर्ग खाते क्रमांक 5 2 0 0 0 0 0 4 4 आयएफसी कोड एसबीआय) ही रक्कम बँकेत भरल्यानंतर ९४२२३६६८१० या मोबाईल क्रमांकावर कृपया एसएमएस करावा. तसेच "वंचित बालके आणि समाज" या विषयावर जनजागृतीचे अभियान चालविणे आवश्‍यक आहे, त्यादृष्टीने लातूर भूकंपाच्या स्मृतिदिनी रविवार 30 सप्टेंबर 2018 रोजी सोलापूर येथे एक परिसंवाद आयोजित करण्यात येणार आहे तसेच आपल्या घरच्या रौप्यमहोत्सवी दिनानिमित्त स्मरणिका काढण्यात येणार असून त्यात माजी विद्यार्थ्यांच्या यशोगाथा व कार्यकर्त्यांचे अनुभव कथन याबरोबरच "वंचित बालके आणि समाज" या विषयावर मूक-

बधिर,मतिमंद मुले,बाधित मुले यांच्या संगोपनासाठी चालविल्या जाणाऱ्या संस्ताचालकांचे अनुभव तसेच या क्षेत्रातील विशेषतज्ञ व राजकीय पक्षांचे प्रतिनिधी यांच्या प्रकट मुलाखती देण्यात येणार आहेत. व्यापारी आणि सहकारी संस्थांनीही या स्मरणिकेस जाहिरातीच्या स्वरूपात सहकार्य करावे.रौप्य महोत्सव समारोप समारंभ रविवार, दिनांक 23 डिसेंबर 2018 रोजी आपले घर,नळदुर्ग येथे होणार आहे. त्याच्या आदल्या दिवशी म्हणजेच 22 डिसेंबर 2018 रोजी दुपारी 3 ते 7 या वेळेत माजी विद्यार्थ्यांचा मेळावाही घेण्यात येणार आहे.या सर्व उपक्रमात यथाशक्ती सहभागी होऊन आपले घरला सहकार्य करावे,असे आवाहन आपले घरचे अध्यक्ष पन्नालाल सुराणा आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केले आहे.
 
Top