उस्मानाबाद :

तालुक्यातील बेंबळी येथील वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत असलेल्या युवक, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या ‘ग्रामसेवा ग्रुप’ने सलग दुसर्‍या वर्षी गावात गणेश विसर्जनादिवशी म्हणजेच रविवार दि. 23 सप्टेंबर रोजी श्रीगणेश मूर्ती व निर्माल्य संकलनाचा उपक्रम हाती घेतला आहे. संकलन केलेल्या मूर्ती दोन करून राहिलेल्या मूर्तींचे योग्यरित्या विसर्जन करण्यात येणार आहे. 

बेंबळी येथील महाविद्यालयीन विद्यार्थी, पत्रकार, वकिल, उद्योजक, व्यापारी, शासकीय व निमशासकीय संस्थांतील नोकरदार तसेच वेगवेगळ्या क्षेत्रातील व्यावसायिकांचा ग्रामसेवा ग्रुप प्रत्येक रविवारी गावात सकाळी 6 ते 8 या वेळेत स्वच्छता, वृक्षारोपण, वृक्षसंगोपन, आरोग्य व शिक्षण विषयक उपक्रम, शिबिर असे उपक्रम राबवित आहे. गणेश विसर्जनदिनी ग्रामसेवेचा 84 वा रविवार आहे. या दिवशी गतवर्षीप्रमाणे पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर तसेच गणेशमूर्तींची विटंबना होऊ नये यासाठी गणेशमूर्ती व निर्माल्य संकलन करण्यात येणार आहे. गतवर्षी दीड हजाराहून अधिक गणेशमूर्तींचे संकलन करून योग्यरित्या त्यांचे विसर्जन करण्यात आले होते. 

ग्रामसेवा ग्रुपने औरंगाबाद येथील महात्मा फुले कृषी प्रतिष्ठान, पाणी फौंडेशन, बीजेएसच्या मदतीने सावळा नदीचे जवळपास तीन किलोमीटरपर्यंत खोलीकरण व रूंदीकरणाचे काम करून नदीला पुनर्जीवन देण्याचा प्रयत्न केला आहे. यंदा बर्‍यापैकी पाऊस नसल्याने नदीपात्रात पाण्याची कमतरता आहे. गणेशमूर्तींचे या नदीत विसर्जन करणे तुर्तास योग्य नसल्याने ग्रामसेवाने गणेशमूर्ती संकलन करून ज्यांना हवी ती मूर्ती दान करणे व उर्वरित मूर्तींचे योग्य ठिकाणी विसर्जन करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. त्याबाबतचे आवाहनपर संदेश सोशल मीडिया व बॅनरच्या माध्यमातून ग्रामस्थांना देण्यात आला असून ग्रामस्थांनी गतवर्षीप्रमाणे यंदाही या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन ग्रामसेवाच्यावतीने करण्यात आले आहे. 
 
Top