काटी : उमाजी गायकवाड

 कोरोनासारख्या जैविक हल्ल्याच्या संकटातून बाहेर पडण्यासाठी सरकार आणि प्रशासन रात्रंदिवस परिश्रम घेत आहे. प्रशासनाला थोडेबहुत लोक वगळता बहुतांश लोक मोठ्या प्रमाणात प्रतिसादही देत आहे. या कोरोनाविरोधी  लढ्यासाठी व या अस्मानी संकटातून बाहेर पडण्यासाठी अनेक लहान-मोठ्या दानशूरांचे हात सरसावले आहेत. या संकटातून बाहेर पडण्यासाठी तुळजापुर तालुक्यातील तामलवाडी येथील रस्त्यावर बसून किरकोळ भाजीविक्रीचा व्यवसाय करणारे अतिशय प्रतिकूल परिस्थितीतूनही आपल्या मायभूमीसाठी  पांडुरंग लोंढे व त्यांच्या पत्नी मंदाकीनी लोंढे या दांपत्यानी सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेतून किरकोळ भाजीपाला विक्रीमधून  मिळालेल्या रकमेतून  कोरोनाग्रस्तांसाठी आपली छोटीशी मदत म्हणून पाच हजार रूपये मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये जमा केले.


    जगामध्ये कोरोना विषाणूने अक्षरक्ष: थैमान घातले असून जगभरात लाखो लोकांना याची झळ पोहोचली आहे. जगभरात हजारो  लोक मृत्युमुखी पडले आहेत. तर अनेकजण बाधित आहेत. देशासह महाराष्ट्रातही कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देश एकवीस दिवस लाॅकडाऊन असल्याने अनेक कुटुंबावर उपासमारीचे संकट ओढवले आहे. अशा अनेक कुटंबाना आधार मिळावा याकरीता केंद्र,राज्य सरकारने मदतीचे आवाहन केले आहे अनेक दाते, दानशुर लोक मदतीसाठी पुढे सरसावले आहेत. त्या अनुषंगाने सामाजिक कर्तव्य म्हणून आपणही समाजाचे देणे आहोत या सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेतून मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राच्या सिमेवरील  तामलवाडी येथील रस्त्यावर भाजीपाला विकून आपला उदरनिर्वाह करणारे शेतकरी कुटुंबातील पांडुरंग लोंढे आणि त्यांच्या पत्नी सौ.मंदाकिनी लोंढे  या दांपत्याने कोरोनाग्रस्तांसाठी मदतीचा हात पुढे करीत तुटपुंजी का होईना आपल्या स्व कमाईतून पाच हजार रुपये  मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये जमा केले.‌
एका सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील भाजीविक्रेत्याने कोरोनाग्रस्तांसाठी मदतीचा हात दिल्याने तामलवाडी व परीसरामध्ये त्यांचे कौतुक होत आहे . देशासह राज्यावर महामारीचे संकट ओढवले असून विविध सेवाभावी संस्था, सामाजिक संघटना आदीसह   प्रत्येकानी सामाजिक बांधिलकीतून पुढे येऊन प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन करून त्यांच्या सूचनांचे पालन करून कोणीही घराबाहेर पडू नये असे आवाहनही भाजीविक्रेते पांडुरंग लोंढे यांनी केले.
 
Top