उस्मानाबाद, दि. 23 :
कोरोनाविरुद्ध लढणाऱ्या डॉक्टर, नर्स, आरोग्य कर्मचारी यांसह संबंधित कर्मचाऱ्यांना पन्नास लाख रुपयांचे विमा कवच दिले आहे. तसेच ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका आणि आशा कार्यकर्त्या यांना शासनाचे २५ लाख रुपयांचे विमा कवच आहे. त्याप्रमाणे कोरोना विषाणू प्रतिबंध व उपाय योजनेसाठी राज्यात कार्यरत असणाऱ्या शिक्षकांना ५० लाख रुपयांचे विमा कवच द्यावे, अशी मागणी तुळजापुरचे आमदार राणाजगजिसिंह पाटील यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.
संपूर्ण जगातच कोरोनाच्या विषाणूने थैमान घातले आहे. त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आणि रुग्णांवर उपचार करण्यासाठी अनेक डॉक्टर, नर्स, पोलीस, आरोग्य कर्मचारी, अंगणवाडी कर्मचारी, आशा कार्यकर्ते, शिक्षक व ग्रामसेवक आपला जीव धोक्यात घालून गाव पातळीवर आपले योगदान देत आहेत. अनेक जिल्ह्यात जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी शिक्षकांच्या सेवा आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे वर्ग केलेले आहेत. तरी इतर कर्मचार्यांप्रमाणे शिक्षकांनाही विमा संरक्षण देण्याची मागणी सातत्याने होत आहे. परंतु, अध्याप पर्यंत शासनाकडून याबाबत निर्णय घेण्यात आलेला नाही.
राज्याच्या शालेय शिक्षण व क्रिडा विभागाच्या मंत्री मा.ना.श्रीमती वर्षा गायकवाड यांच्या बरोबर आ. राणाजगजितसिंह पाटील साहेब यांनी या विषयी चर्चा केली. या शिक्षकांना विमा संरक्षण देण्याबाबत त्या सकारात्मक असून त्यांनी देखील मुख्यमंत्री यांच्याकडे याबाबत विनंती केल्याचे त्यांनी सांगितले.
या विषयाचे महत्त्व व गांभीर्य लक्षात घेऊन कोरोना लढयात सामील असलेल्या हजारो शिक्षक बांधव व भगीनींना रु.५० लाखाचे विमा संरक्षण देण्याबाबत तातडीने आदेश व्हावेत अशी विनंती या अनुषंगाने राज्याचे मुख्यमंत्री ना. उद्धव ठाकरे यांच्याकडे आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी केली आहे.

