तामलवाडी : सर्जेराव गायकवाड
कोविड- १९ चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता उस्मानाबाद येथे कोरोना निदान चाचणी केंद्र उभारण्यात येत आहे.या कोरोना तपासणी केंदास तामलवाडी येथील बालाजी अमाईन्स लि यांच्यावतीने दि.३ रोजी पंधरा लाख रू किमतीचे अद्यावत असे अॅटोमेटेड न्युक्लिक अॅसिड एक्ट्राक्षम सिस्टीम (आरएनए ) तपासणी यंत्र उपलब्ध करून दिले आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोना रूग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे.जिल्ह्यामधे कोरोना तपासणी केंद्र नसल्यामुळे कोरोना रूग्णांचे स्वॅबचे नमुने तपासणीसाठी सोलापूर व लातुर जिल्ह्यात पाठवुन स्वॅब तपासणी केली जात आहे.त्यामुळे प्रशासनाला कोरोनाच्या रूग्णावर उपचार करण्यास विलंब लागत असुन अडचणी निर्माण होत आहेत.यावर उपाय म्हणून जिल्हा प्रशासन डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उप परीसर उस्मानाबाद येथे अद्यावत कोरोना निदान चाचणी केंद्र उभारण्यात येत आहे.या चाचणी केंद्रास अद्यावत उपकरणाची आवश्यकता असल्याने जिल्हाधिकारी दिपा मुधोळ -मुंडे यानी सामाजिक कार्यात अग्रेसर असणार्या बालाजी अमाईन्सकडे अद्यावत यंत्र देण्याची विनंती केली.त्यांच्या विनंतीस तात्काळ मान्यता देत दि.३ रोजी बालाजी अमाईन्सचे संचालक डी.राम रेड्डी,एन.राजेश्वर रेड्डी यानी या कोरोना चाचणी केंद्रास पंधरा लाख रुपये किमतीचे आरएनए हे अद्यावत मशीन उपलब्ध करून दिली आहे.यामुळे कोरोना रूग्णांचे स्वॅब तपासणी नमुने घेऊन त्यांच्यावर तात्काळ उपचार करण्यास मदत होणार आहे. कोरोनाच्या या महामारीमध्ये बालाजी अमाईन्स सामाजिक बांधिलकी जपत प्रशासनास व गरजुंना मदतीचा हात देत आहे यापुढेही शक्य होईल ती मदत आम्ही करू असे व्यवस्थापकीय संचालक डी.राम रेड्डी यांनी यावेळी बोलताना सांगितले.
याप्रसंगी विद्यापिठाचे संचालक पी.पी.दिक्षीत,सदस्य,संजय निंबाळकर,बालाजीचे व्यवस्थापकीय संचालक डी.राम रेड्डी,नियोजन अधिकारी सोमनाथ रेड्डी,मारूती सावंत,विनोद चुंगे आदी उपस्थित होते.
