काटी : उमाजी गायकवाड

 तुळजापूर तालुक्यातील काटी येथे येथील सरपंचासह आठ रुग्ण आढळून आले असून त्यांच्या संपर्कातील 38 जणांना स्वॅब घेण्यासाठी तुळजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठवले असून 42 जणांना होम कोरोंनटाईन राहण्यास सांगितले आहे.

  काटीतील वाढत्या कोरोना रुग्णाच्या पार्श्र्वभूमीवर  तुळजापूर तालुक्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी भेट देऊन गावातील पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून वाढत्या कोरोनाच्या पार्श्र्वभूमीचा आणि सुरू असलेल्या उपाययोजना संदर्भात आढावा घेतला. यावेळी चेअरमन विक्रमसिंह देशमुख यांनी तालुक्यातील काटी गाव मोठे असल्याचे सांगून काटीसह परिसरातील दहा ते बारा गावाचा मोठा संपर्क असून गावात डॉक्टरची कमतरता असल्याचे सांगून येथील खाजगी डॉक्टरला दवाखाना सुरू करण्यास परवानगी मिळावी अशी विनंती केली. तर माजी ग्रा.पं सदस्य करीम बेग यांनी येथे पोलीसांची कमतरता असल्याचे सांगितले.

 यावर आमदार पाटील यांनी खाजगी डॉक्टरला येथे राहून पुरेशी काळजी घेऊन दवाखाना सुरू ठेवण्यास काही अडचण नसल्याचे सांगितले. तसेच खबरदारीचा उपाय म्हणून आरोग्य विभागाने सुरू केलेल्या उपाययोजनांची माहितीही त्यांनी यावेळी घेतली. काटीतील वाढत्या रुग्णाच्या व येथील सरपंचास कोरोनाची बाधा झाल्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने सुरू केलेल्या उपाययोजनेला सहकार्य करण्याचे व नागरिकांनी घाबरून न जाण्याचे  आवाहन करून स्वत:ची काळजी स्वत: घेणे हाच  कोरोनावर उपाय असल्याचे सांगितले. तसेच नागरीकांना उपाययोजने संदर्भात काही अडचणी असल्यास थेट तहसीलदार यांना कळविण्याच्या सुचना केल्या. तत्पुर्वी तहसीलदार सौदागर तांदळे यांनी ग्रामपंचायत परिसर आणि सरपंच यांच्या राहत्या घराचा परिसर सील केला.तर ग्रामपंचायतीच्या वतीने प्रतिबंधात्मक उपाय म्हणून मागील तीन दिवसांपासून कोरोनाबाधित रुग्णाचा व सार्वजनिक ठिकाणचा परिसर निर्जंतुकीकरण करण्यात आला आहे.तर सोमवारपासून गावात सात दिवस जनता कर्फ्यु पुकारण्यात आला आहे.

    यावेळी आमदार राणाजगजितसिंह पाटील, तहसीलदार सौदागर तांदळे, गटविकास अधिकारी प्रशातसिंह मरोड, विस्तार अधिकारी वैरागे, आरोग्य अधिकारी डॉ. स्मिता लोंढे, सभापती मुळे, जिल्हा परिषद सदस्य राजकुमार पाटील, भाजपचे तालुकाध्यक्ष संतोष बोबडे, चेअरमन विक्रमसिंह देशमुख, डॉ.अजित राठोड, उपसरपंच सुजित हंगरगेकर, ग्रामसेवक लक्ष्मीकांत सुरवसे, तलाठी प्रशांत गुळवे,  ग्रा.प. अनिल बनसोडे, सतीश देशमुख,करीम बेग,हेरार काझी, माजी सैनिक इजदानी बेग आदी मान्यवर उपस्थित होते.
 
Top