काटी : उमाजी गायकवाड
तुळजापूर तालुक्यातील सावरगाव येथील रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने प्रतिबंधात्मक उपाय म्हणून बसस्थानक परिसर सील करण्यात आला असून तीन दिवस जनता कर्फ्यू पुकारण्यात आला आहे. येथील कोरोनाबाधित रुग्ण हा तुळजापूरातील हॉटेल व्यावसायिक आहे. कोरोनाबाधित रुग्णाच्या कुटुंबीयांतील नऊ सदस्य व हॉटेल मधील तीन वेटर अशा एकूण अकरा जणांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. त्या पार्श्वभूमीवर शनिवार दि. 11 जुलै रोजी जिल्हा परिषद अध्यक्ष सौ. अस्मिता कांबळे यांनी भेट देऊन येथील परिस्थितीची पाहणी केली. यावेळी कन्टेटमेंट झोन मधील कुटुंबियांना आर्सिनिक आल्बम 30 च्या गोळ्या आणि सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले.
यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. अस्मिता कांबळे, जिल्हा परिषद सदस्य राजकुमार पाटील, आरोग्य अधिकारी डॉ. बाचपल्ले, सरपंच रामेश्वर तोडकरी, उपसरपंच आनंद बोबडे, माजी सरपंच प्रभावती मारडकर,यशवंत कुलकर्णी, सुधीर मगर, राजेंद्र डोलारे (केमवाडी) आदीजण उपस्थित होते.
