उस्मानाबाद, दि.13 :- महाराष्ट्र शासनाचे मार्गदर्शक सूचनांनुसार दि. 31 जुलै 2020 पर्यंत वाढविण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या कालावधीत करावयाच्या कार्यवाहीबाबत आदेश पारित केला आहे.

        महाराष्ट्र शासनाने दिलेल्या परवानगीनुसार  दि. 9 जून 2020 रोजीचे आदेशान्वये उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये शैक्षणिक संस्था (विद्यापीठे, महाविद्यालये, शाळा) ची कार्यालये, कर्मचारी  यांना ई-सामग्री (e-content) चा विकास, उत्तरपत्रिकांचे मूल्यमापन, निकाल घोषित करणे यासह फक्त अशैक्षणिक कामकाजासाठी कार्यालये चालू करता येतील असा आदेश दिलेला आहे.

महाराष्ट्र ज्ञान महामंडळाचे जिल्हा समन्वयक धनंजय जेवळीकर यांनी उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र ज्ञान महामंडळाच्या (MKCL)  88 अधिकृत अध्ययन केंद्रांमध्ये विद्यार्थ्यांची ऑनलाईन कौन्सेलिंग, अॅडमिशन प्रोसेस, मोबाईल अॅप रजिस्ट्रेशन, ऑनलाईन लर्निंगमध्ये येणाऱ्या तांत्रिक अडचणी  सोडविण्यासाठी त्यांचे केंद्र उघडुन कार्यालयीन कामकाज सुरु करण्याची परवानगी मिळणेबाबत विनंती केली आहे.

 त्यामुळे जिल्हाधिकारी  तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणच्या अध्यक्षा  दीपा मुधोळ-मुंडे यांनी खालील अटी व शतींच्या  आधारे उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र ज्ञान महामंडळाची (MKCL) 88 अधिकृत अध्ययन केंद्र चालू करण्यास परवानगी दिली आहे.

अध्ययन केंद्रामध्ये सकाळी 9 ते सायंकाळी 5 या वेळेत केवळ कार्यालयीन कामकाज करण्यास परगानगी देण्यात येत असून विद्यार्थ्यांना अध्ययन केंद्रामध्ये प्रवेश देऊन प्रशिक्षण देण्याची परवानगी नाही. प्रशिक्षणासाठी ऑनलाईन लर्निग पद्धतीचा अवलंब करण्यात यावा.

अध्ययन केंद्रांना अॅडमिशन प्रोसेससाठी विद्यार्थ्यांना अध्ययन केंद्रामध्ये बोलाविण्याची परवानगी नसून ॲडमिशन प्रोसेससाठी त्यांनी ऑनलाईन पद्धतीचा उपयोग करावा.

अध्ययन केंद्रामध्ये चार कर्मचाऱ्यांना कामकाज करण्याची परवानगी देण्यात येते.

अध्ययन केंद्रामध्ये कार्यालयीन कामकाज करत असताना सामाजिक अंतराचे (सोशल डिस्टन्सींग) पालन करणे बंधनकारक आहे.

अध्ययन केंद्रामध्ये कार्यालयीन कामकाज करताना कर्मचाऱ्यांनी फेस कव्हर, गॉगल्स, मास्क, स्वच्छ रुमाल, हॅण्डग्लोव्हज, सॅनिटायझर इ. चा वापर करणे बंधनकारक आहे.

अध्ययन केंद्रातील उपकरणांचा वापर करण्यापूर्वी व वापर केल्यानंतर त्यांचे निर्जंतूकीकरण करण्यात यावे.

अध्ययन केंद्राच्या परिसरात व सार्वजनिक जागी वारंवार स्पर्श केले जाणारे पृष्ठभाग (दरवाजांचे कडी-कोंडे, लिफ्टचे बटन, जिन्यावर लावलेली संरक्षक जाळी (handrail), बाके (benches),स्वच्छतागृहे इ. ची स्वच्छता व नियमित निर्जतुकीकरण (1 % सोडियम हायपोक्लोराईटचा वापर करुन) करणे अनिवार्य आहे.

अध्ययन केंद्राच्या परिसरामध्ये तसेच विशेषत: प्रसाधनगृहे (lavatories), पिण्याच्या पाण्याची व हात धुण्याची ठिकाणे (drinking and hand washing stations/areas) चे ठिकाणी प्रभावीपणे व वारंवार स्वच्छता (sanitization) करण्यात यावी.

अध्ययन केंद्रामध्ये कामकाज करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी नियमितपणे सॅनिटायझरचा वापर करावा. तसेच साबणाने हात स्वच्छ धुवावेत.

अध्ययन केंद्रामध्ये कामकाज करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी काम करताना डोळे, नाक व तोंडाला स्पर्श करणे कटाक्षाने टाळावे.

 सर्दी, ताप व श्वासोच्छवास घेण्यास त्रास होणे इ. कोवीड-19 ची लक्षणे असलेल्या कर्मचाऱ्यांना अध्ययन केंद्रामध्ये कामकाज करण्याची परवानगी असणार नाही.

महाराष्ट्र ज्ञान महामंडळाकडून वेळोवेळी देण्यात येणा-या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे..

भारत सरकार व महाराष्ट्र शासनाचे आरोग्य विभागाने वेळोवेळी दिलेल्या आदेशांचे पालन करणे बंधनकारक राहील.

महाराष्ट्र शासन, महसूल व वने, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागाच्या दि. 31.05.2020 च्या अधिसूचनेतील परिशिष्ट 1 मध्ये नमूद केलेल्या कोव्हीड 19 चे व्यवस्थापनासंदर्भातील राष्ट्रीय सूचनांचे पालन करणे बंधनकारक राहील.

      या आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती, संस्था अथवा संघटना "महाराष्ट्र कोव्हीड 19 उपाययोजना नियम, 2020" चे नियम 11 नुसार, भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) कलम 188 मधील तरतुदींनुसार दंडनीय, कायदेशीर कारवाईस पात्र राहील.

         या आदेशाची अंमलबजावणी आदेशाचे दिनांकापासून लागू होईल.

 
Top