नळदुर्ग, दि. 02 : शहरात महावितरणने उभे केलेले विजेचे पोल तात्काळ सिमेंट कॉन्क्रीटने मजबूत करावे, या मागणीसाठी शनिवार दि. ५ सप्टेंबर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने येथील महावितरण कार्यालयासमोर थाळी नाद आंदोलन करण्यात येणार असल्याचे बुधवारी निवेदनाद्वारे सांगण्यात आले आहे.

नळदुर्ग शहरात विविध ठिकाणी महावितरणच्या वतीने विजेचे पोल उभे केले आहेत. सदरील पोल उभे करीत असताना सिमेंट कॉन्क्रीट करून मजबुत न करता तसेच उभे केले आहेत. यावर मनसेने आक्षेप घेऊन वारंवार निवेदन देऊन पाठपुरावा केला. मात्र महावितरणने याकडे दुर्लक्ष केल्याचे सांगून भविष्यात यामुळे धोका निर्माण होऊ शकतो व विजेचा खोळंबा होउ शकतो म्हणून महावितरणने हे सर्व पोल सिमेंट कॉन्क्रीटने मजबूत करावे, या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने शनिवार दि. ५ सप्टेंबर  रोजी सकाळी अकरा वाजता महावितरण कार्यालया समोर थाळी नाद आंदोलन करण्यात येणार आहे, असे निवेदनाद्वारे सांगण्यात आले आहे.

निवेदनावर जिल्हा सचिव ज्योतिबा येडगे, शहराध्यक्ष अलीम शेख, सरचिटणीस प्रमोद कुलकर्णी, शहर उपाध्यक्ष रमेश घोड़के यांच्या स्वाक्षरी आहेत.


 
Top