लातूर, दि. 26 : उस्मानाबाद जनता सहकारी बँक लिमिटेड उस्मानाबादच्या बेकायदेशीर व नियमबाह्य कारभाराची चौकशी करण्याची मागणी जनरल मॅनेजर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया मुंबई व जनरल मॅनेजर रिझर्व्ह बँक आफ इंडिया अर्बन बँक विभाग नागपूर यांच्याकडे पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते व्यंकटराव पनाळे यांनी केली आहे.
उस्मानाबाद जनता बँकेत सर्वसामान्यांच्या मोठ्याप्रमाणात ठेवी असून बँकेचे विद्यमान संचालक मंडळ गेल्या चार-पाच वर्षापासून आरबीआयच्या माफ दंड परिपत्रकाचे पालन न करता स्वहितासाठी, मनमानी काम करित असल्याचे आरोप करण्यात आले आहे. या बँकेच्या संचालक मंडळाची मुदत दि. 24 सप्टेंबर 2020 ला संपली आहे. मागील वर्षभरात नियमबाह्य व स्वार्थापोटी कर्जदाराची उत्पन्न क्षमता न पाहता कोट्यावधी रुपये कर्ज वाटपाचा सपाटा लावल्याचे बँकेचे सभासद व्यंकटराव पनाळे यांनी म्हटले आहे.
संचालक मंडळाची मुदत संपल्याने ताबडतोब बँकेच्या नवीन संचालक मंडळासाठी निवडणुक कार्यक्रम जाहीर करणे आवश्यक असताना निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर न करता व सदरील संचालक मंडळास केंद्रीय निबंधक सहकारी संस्था दिल्ली यांची संचालक मंडळास मुदत मिळाली नसतानासुध्दा सदरील संचालक मंडळ बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा जे की बँकेच्या हिताच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची असून ती सर्वसाधारण सभा दि. 18 ऑक्टोबर 2020 रोजी घेण्याचा प्रयत्न चालू असल्याचेही म्हटले आहे.
नागरी सहकारी बँकासाठी वार्षिक सर्वसाधारण सभा घेण्यासंबंधी केंद्रीय निबंधक सहकारी संस्था दिल्ली यानी अटी व नियम तसेच सर्वसाधारण सभा कशा प्रकारे घेण्यात यावी, या संबंधीचे मार्गदर्शक तत्वे व सुचना दि. 25 ऑगस्ट 2020 रोजी परिपत्रकाद्वारे कळविले असतानाही त्या नियमाचे न करता ही सभा घाईने घेवून मागील आर्थिक वर्षातील केलेल्या कामकाजास व आर्थिक व्यवहारास मान्यता घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. जो की बँकेच्या हिताच्या दृष्टीने व ठेवीदाराच्या हिताच्या दृष्टीने धोकादायक ठरु शकते, असा इशारा बँकेचे सभासद व पत्रकार व्यंकटराव पनाळे यांनी निवेदनाद्वारे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यांना दिला आहे.
