तुळजापुर : कुमार नाईकवाडी
मुसळधार पावसामुळे नुकसानग्रस्त भागांची पाहणी करुन शेतक-यांच्या व्यथा समजून घेण्यासाठी व त्यांना पुरेशी मदत करण्यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे बुधवार दि. 21 रोजी तुळजापूर शहरात येत आहेत. त्या पार्श्वभूमीवर तुळजापूर न.प. च्या वतीने शहरातील रस्ते साफसफाई, सॅनिटायझर फवारणी आदी कामे करण्यात येत आहेत.
न.प. मुख्याधिकारी आशिष लोकरे यांच्या नेतृत्वाखाली 80 मजूर व 44 कर्मचारी कार्यरत असून शहरातील प्रत्येक रोडवरील प्लास्टिक कचरा, डेब्रिज इत्यादी उचलण्यात येत असून शहराची सर्व बाजूने साफसफाई करण्यात येत आहे. तसेच शहरांमध्ये मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्यात आलेला असून रस्त्यावर एकही मोकाट जनावर फिरणार नाही, यासाठी विशेष काळजी घेतली जात आहे.
अग्निशमन वाहन सर्व कर्मचाऱ्यांसह दौऱ्याच्या ठिकाणी तैनात करण्यात आले आहे. सर्व कामे निर्धारीत वेळेत होतील. याकडे मुख्याधिकारी आशिष लोकरे हे स्वतः जातीने लक्ष देत असून सदर दौरा सुरळीत पार पाडण्यासाठी नगराध्यक्ष सचिन रोचकरी, सर्व नगरसेवक व कर्मचारी प्रयत्न करीत आहेत.