भुम, दि. 29 : बँकेच्या खात्यातील 60 हजार रुपये ऑनलाईन काढून अज्ञाताने एकाची फसवणूक केल्याची घटना भुम येथे घडली असून याप्रकरणी पोलीसात एकाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, ऋषीकेश सुनिल नवले, रा. विद्यानगर, भुम यांच्या फोनवर दि. 31.03.2020 रोजी अनोळखी मोबाईल फोनवरुन एक लिंक आली होती. या लिंकच्या वैधतेविषयी खात्री न करता नवले यांनी त्या लिंकवर व्यक्तीगत बँक खाते, पासवर्ड भरला तसेच आलेला ओटीपी संदेश समजून न घेता ओटीपी भरला यावर लिंक पाठवणाऱ्या समोरील अज्ञात मोबाईल धारकाने नवले यांच्या खात्यावरील 60,000 ₹ रक्कम फोन पे द्वारे ऑनलाईन वळती केली. यावर नवले यांनी त्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधुन पैसे परत मागीतले असता त्या अज्ञात व्यक्तीने त्यांना 10,000 ₹ ऑनलाईन पध्दतीने परत करुन उर्वरीत रक्कम लवकरच परत करेल, असे आश्वासन दिले. यावर नवले यांनी ती रक्कम परत मिळेल याची वाट पाहीली परंतु आजतागायत त्या अनोळखी व्यक्तीने बाकी असलेली 50,000 ₹ परत न करता नवले यांची फसवणूक केली. अशा मजकुराच्या ऋषीकेश नवले यांनी काल दि. 28.10.2020 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन माहिती तंत्रज्ञान कायदा कलम- 66 (सी) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.