हन्नुर : नागराज गाढवे
अक्कलकोट तालुक्यातील दर्शनाळ येथील हरणा नदीवर बांधण्यात आलेला पुल मुसळधार पावसामुळे वाहून गेला आहे.
दर्शनाळ येथील हरणा नदीवर सात वर्षांपूर्वी पुल बांधण्यात आले होते. पण गेल्या दोन दिवसांपासून तांदुळवाडी, मुस्ती, आरळी भागात झालेल्या मुसळधार पावसामुळे पुल वाहुन गेले आहे. यामुळे दर्शनाळ येथील नागरिकांना सोलापूर, तुळजापूर, नळदुर्ग येथे जाण्यासाठी चार किलोमीटर अंतर पायपीट करत बोरेगाव येथे जावे लागत आहे.
दर्शनाळ नागरिकांना सोलापूर, तुळजापूर, नळदुर्ग येथे जाण्यासाठी एकच मार्ग होता, तोही बंद झाला आहे. यामुळे नागरिकांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. दर्शनाळ हे तालुक्यातील टोकाचे गाव असून गेल्या पन्नास वर्षांपासून गावाला शासकीय वाहनाची सोय नाही. यामुळे नागरिकांनी शासनाकडे वारंवार मागणी केल्यानंतर ह गावाजवळ असलेल्या हरणा नदीवर पूल बांधण्यात आले. ग्रामस्थांची सोय झाली पण गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पुल वाहुन गेले आहे.
वाहुन गेलेल्या पुलावरून हौशी तरुण सेल्फी काढत आहेत. यामुळे जीवाला धोकाही संभवतो प्रशासनाने हरणा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
