उस्मानाबाद, दि. 09 : तालुक्यातील सर्वांत मोठया  गावातील ग्रामपंचातचा कारभार प्रशासकीय अधिकारी व ग्रामविकास अधिकारी उंटावरून पाहत आहेत. त्यामुळे बेंबळी ग्रामस्थ्यांच्या किरकोळ ही समस्या सुटत नसल्यामुळे ग्रामस्थांमधुन संताप व्यक्त करण्यात येत आहे. तसेच   ग्रामस्थांच्या समस्यांकडे या अधिकाऱ्यांचे लक्ष्य वेधण्यासाठी शिवसेनेच्या वतीने अधिकाऱ्यांच्या रिकाम्या खुर्च्यांना निवेदन देऊन गावास ३ दिवसात पाणीपुरवठा सुरू न झाल्यास बेंबळी ग्रामपंचायतीस टाळे ठोकण्याचा इशारा देण्यात आला आहे.

जिल्हयात जोरदार झालेल्या परतीच्या पावसामुळे सर्व जलप्रकल्प ओव्हर फ्लो झाले आहेत. तसेच बेंबळी गावास पाणीपुरवठा करणारा रूईभर येथील साठवण तलाव ही पुर्ण क्षमतेने भरला आहे. असे असून ही बेंबळी येथील प्रशासकीय अधिकारी व ग्रामविकास अधिकाऱ्यांच्या लापरवाईमुळे गावातील नागरिकांना पाण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. वर्षांतील सर्वात मोठा सण म्हणुन दिपावलीकडे पाहिले जाते. 

परंतु नागरिकांना सणात ही पाणी विकत घेण्याची वेळ येत आहे. सध्या बेंबळी ग्रामस्थाची स्थिती धरण आहे उशाला, कोरड आहे घशाला अशा प्रकारची झालेली आहे. कोरोना व झालेल्या अतिवृष्टीमुळे ग्रामस्थ व शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती नाजुक बनली आहे. त्यामुळे  गावास येत्या तीन दिवसात पाणी पुरवठा सुरू न झाल्यास दि. १३ नोव्हेंबर रोजी शिवसेनेच्या वतीने बेंबळी ग्रामपंचायत कार्यालयास टाळे ठोकण्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.

निवेदनावर शिवसैनिक शामसुंदर पाटील, अनिल बागल, मुकुंदराज आगलावे, किरण मोहिते, श्री राम वाळके व नाभिक महामंडळाचे जिल्हा सल्लागार दगडू राऊत यांच्यासह अन्य शिवसैनिकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

 
Top