तुळजापूर, दि. 02 : अज्ञात युवकाने एटीएम कार्डची अदलाबदल करुन एका व्यक्तीच्या एटीएम कार्डवरुन विविध ठिकांणाहुन तब्बल एक लाख रुपये काढून घेतल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी अज्ञात व्यक्तींविरुध्द तुळजापुर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबतची सविस्तर माहिती अशी की, फुलचंद भोसले, रा. गंधोरा, ता. तुळजापूर हे दि. 31.10.2020 रोजी तुळजापूर येथील जुन्या बसस्थानका शेजारच्या वक्रांगी एटीएम केंद्रात पैसे काढत असतांना एका अनोळखी युवकाने त्यांची मदत करण्याच्या बहाण्याने त्यांच्या एटीएम कार्डची अदलाबदल केली तसेच फुलचंद भोसले यांचा पासवर्ड बघीतला. नंतर त्या भामट्याने भोसले यांच्या एटीएम कार्ड द्वारे वेळोवेळी विविध केंद्रांतून एकुण 1,08,000/-रु. रक्कम काढली. अशा मजकुराच्या फुलचंद भोसले यांनी काल दि. 01.11.2020 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 420 आणि माहिती तंत्रज्ञान कायदा कलम- 66 (सी), 66 (डी) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

 
Top