नळदुर्ग, दि. 14 : शहरात नगर परिषदेच्या वतीने गेल्या वर्षभरात विविध ठिकाणी विकास कामांची सुरुवात करण्यात आलेली आहे. परंतु गुत्तेदार यांना दिलेल्या कामांमध्ये अनियमितता असल्याचे दिसून येत असून चालू असलेल्या विकास कामांची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी नळदुर्ग भाजपाच्यावतीने जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
निवेदनात नमूद केले आहे की, नळदुर्ग शहरात पालिकेच्यावतीने सध्या बरीच कामे थांबविण्यात आलेली आहेत. ज्या ठेकेदाराना ही कामे दिली आहेत ती कामे निकृष्ट दर्जाची होत आहेत. त्या चालू असलेल्या कामावर नगरपरिषदेचे कोणत्याही प्रकारचे नियंत्रण नसल्याचे दिसून येत आहे. चालू कामाची पाहणी करून ती चांगल्या दर्जाची व्हावेत हीच जनतेची अपेक्षा आहे. कामाची पाहणी करण्याकरिता नगरपरिषदेचे अभियंता त्या कामाच्या ठिकाणी जात नाहीत त्यांचा बांधकाम व बांधकाम दर्जाचा अहवाल नगर परिषदेमध्ये बसून ठरवत असल्याबाबत निवेदनात म्हटले आहे.
नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांच्याकडून गुतेदाराला कामाचे बिले आजपर्यंत दिली आहेत. या कारणामुळे गुत्तेदार हे मनमानी कारभार करीत आहेत. या झालेल्या कामात दर्जेदारपणा नाही त्यामुळे शासनाचे कोट्यवधी रुपयाचे विकास कामाच्या नावाखाली नुकसान होत आहे. वारंवार मुख्याधिकारी यांना सांगून व त्यांच्या निदर्शनास या सर्व बाबी आणून देखिले मुख्य अधिकारी यांच्याकडून कोणत्याही प्रकारची आजपर्यंत कार्यवाही करण्यात आलेले नाही. सध्या शहरात हुतात्मा निलया स्वामी उद्यान, रोकडे हनुमान मंदिर, वसंत नगर येथील सभागृह, व्यास नगर येथील विठ्ठल मंदिर सभागृह, असे विविध विकास कामे चालू असून एकाही बांधकामावर कोणतीही अंदाजपत्रके जनतेसाठी बोर्डावर लावण्यात आलेली नसल्याचेही या निवेदनात म्हटले आहे. तसेच संगनमताने बिलाची रक्कम अदा केली जात आहेत. तरी येथील चालू असलेल्या विकास कामांची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी जिल्हाधिका-यांना दिलेल्या निवेदनात केली आहे. या निवेदनावर भाजपा शहराध्यक्ष पद्माकर घोडके यांची स्वाक्षरी आहे.