नळदुर्ग,दि.५ : विलास येडगे
एस.टी.बसमध्ये प्रवासा दरम्यान एका अल्पवयीन शाळकरी विद्यार्थीनीचा विनयभंग करुन आरोपीने अर्वाच्या भाषेत शिवीगाळ करुन पळुन जाण्याचा प्रयत्नात असताना प्रवाशानी आरोपीस पकडुन पोलिसांच्या ताब्यात दिले.याप्रकरणी पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली आहे.
अणदुर ता. तुळजापूर येथिल घटना ताजी असतानाच पुन्हा एकदा अल्पवयीन शालेय विद्यार्थिनीला अश्लील शिवीगाळ करून तीचा विनयभंग करण्याची घटना घडल्याने नळदुर्ग परीसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी याप्रकरणी संबंधित आरोपीविरोधात कलम ३५४ (अ) व बाल लैंगिक अत्याचार कायद्या कलम क १२ प्रमाणे गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. पिडीत विद्यार्थिनी शाळा संपल्यानंतर तीच्या बहीण व भावासोबत नळदुर्ग बसस्थानकातुन बसमधुन आपल्या गावी जात असताना बसमध्ये गर्दी असल्याचा फायदा घेऊन यातील आरोपीने सदरील पिडीत मुलीला वाईट हेतुने वारंवार स्पर्श करून तीचा विनयभंग केला तसेच तीला अश्लील शिवीगाळ केली.
याबाबत पिडीत मुलीने त्याला प्रतिकार करण्याचा प्रयत्न केल्यानंतर संबंधित आरोपी घाबरून बसमधुन उतरून पळुन जाण्याचा प्रयत्न करीत असताना बसमधील प्रवाशांनी त्याला पकडुन पोलिसांच्या स्वाधीन केले. यानंतर पोलिसांनी संबंधित आरोपीविरोधात पीडितेने तक्रार दिल्यानंतर त्याच्याविरुद्ध पोस्को कायद्या व विनयभंग कायद्याने गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. याबाबतचा पुढील तपास पोलिस करीत आहेत. या घटनेने पुन्हा नळदुर्ग शहर व परिसर हादरून गेला आहे.