मुरूम, ता. २७ :
कुसुमाग्रज यांचा जन्म दिवस हा मराठी राजभाषा गौरव दिन म्हणून साजरा करताना मराठी भाषा आणि साहित्याचे जतन करताना वाचन संस्कृती जोपासल्याशिवाय मराठी भाषा समृद्ध होणार नाही असे प्रतिपादन ज्येष्ठ विद्रोही साहित्यिक डॉ. रमाकांत पाटील यांनी केले.
माधवराव पाटील महाविद्यालयात महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मुलन समिती व मराठी अभ्यास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शनिवारी दि.२७ रोजी प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माधवराव पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक सपाटे होते. यावेळी महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मुलन समितीचे जिल्हा कार्याध्यक्ष प्रा. डॉ. महेश मोटे, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी डॉ. रविंद्र आळंगे, आक्युएसीचे समन्वयक डॉ. किरण राजपूत, विद्यापीठाच्या वाणिज्य अभ्यास मंडळाचे सदस्य डॉ. रवींद्र गायकवाड, महाराष्ट्र पत्रकार संघाचे जिल्हा सचिव डॉ. सुधीर पंचगल्ले, प्रा.सतिश रामपूरे, प्रा.दयानंद बिराजदार आदींची प्रमुख उपस्थिती होती.
पुढे बोलताना डॉ. पाटील म्हणाले की, विद्यार्थ्यांनी मराठी भाषेचा आदर करून साहित्याच्या माध्यमातून समाज परिवर्तनासाठी ज्यांनी त्याग व बलिदान दिले अशा साहित्यिकांच्या विचाराचे स्मरण झाले पाहिजे. विद्यार्थ्यांनी वाचनाच्या माध्यमातून विचार शब्दबद्ध करायला शिकावे तरच खऱ्या अर्थाने मराठी भाषा प्रगल्भ होईल असे ते शेवटी म्हणाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. नागनाथ बनसोडे यांनी केले. प्रास्ताविक प्रा. शिवाजी राजोळे आणि आभार प्रा. सोमनाथ व्यवहारे यांनी केले.