काटी येथे दारूच्या अवैध विक्रीला उधाण; पोलिसांचे दुर्लक्ष झाल्याचा सरपंच यांचा आरोप; अवैध दारु विक्री बंद न झाल्यास वरिष्ठांकडे जाण्याचा इशारा
कोरोनाच्या वाढत्या रुग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर काटीत मंगळवार पासून आठवडाभर कडक लॉकडाऊन
काटी,दि.२५ :
तुळजापूर तालुक्यातील काटी येथे अवैध धंदे,मटका, हातभट्टी दारु, देशी, विदेशी दारु, शिंदी असे बेकायदेशीर धंदे खुलेआम राजरोसपणे सुरु असून पोलिसांचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप सरपंच आदेश कोळी यांच्या अध्यक्षतेखाली रविवार दि.25 रोजी घेण्यात आलेल्या ग्रामपंचायतीच्या बैठकीत करण्यात आला.
यापुर्वी दि. 26 जानेवारी रोजी काटी ता. तुळजापूर येथील अवैध धंदे, हातभट्टी दारु, मटका, विदेशी दारु, शिंदी मागील वर्षेभरापासून जोरात सुरु असून ते बंद करण्यात यावेत यासाठी तामलवाडी पोलिसांत ग्रामपंचायतच्या वतीने रितसर तक्रार दिली होती. परंतु एकेठिकाणी छापेमारी करुन हातभट्टीचा साठाही जप्त केला होता. परंतु गावात अजूनही चौका चौकात, पानटपरी मध्ये देशी, विदेशी दारू विक्री, भिमनगर, अण्णाभाऊ साठे नगर मध्ये हातभट्टी दारु, मुख्य चौकात सर्रासपणे मटका सुरू असल्याचे सांगून हे अवैध धंदे पोलीस प्रशासन व उत्पादन शुल्क विभागाने तात्काळ बंद करावेत अन्यथा वरिष्ठांकडे तक्रार दाखल करणार असल्याचा इशारा ग्रामपंचायतच्या वतीने रविवारी झालेल्या बैठकीत देण्यात आला आहे.
काटीत सध्या कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून रुग्णांचे मृत्यू होत आहेत. सध्या गावात घबराटीचे वातावरण असून कोरोना रुग्णांची वाढती रुग्ण संख्येच्या व त्यावरील उपाययोजना संदर्भात ग्रामस्थांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात येऊन येत्या मंगळवारपासून एक आठवडाभर अत्यावश्यक सेवा वगळून गावात कडक लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
यावेळी अनेकांनी गावातील सुरु असलेले अवैध धंदे बंद करावेत अशी मागणी केली. अवैध धंदेवाल्यांचे पोलिसांचे चांगले संबंध असल्याचे बोलले जात असुन किरकोळ कारवाई वगळता अशा कारवाया कितीही केल्या तरी या दारु तस्करांचे कुणीही काहीही बिघडवू शकत नाही अशाच अविभार्वात दारु विक्रते वागताना दिसत आहेत.
एखाद्या वेळी कारवाई झाली तरी पुन्हा नवीन जोमाने दारूची विक्री करणे सुरू करतात. त्यामुळे पोलिसांनी याप्रकरणी लक्ष देऊन गावात सुरू असलेले अवैध धंदे बंद करावेत अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.