पत्रकारितेची अपरिमित हानी!
उस्मानाबाद,दि.२३: 
व्यंकटेश हंबीरे, भाऊसाहेब भन्साळी, नंदकिशोर मंत्री यांच्यापाठोपाठ मोतीचंद बेदमुथा या जेष्ठ पत्रकारांच्या अकाली निधनाने उस्मानाबाद जिह्याच्या पत्रकारितेची कधीही भरुन न येणारी अपरिमित हानी झाली आहे़.

 उस्मानाबाद जिल्हा उद्योग, व्यापार, दळणवळण आदी क्षेत्रामध्ये भलेही मागास, अविकसित असेल़ परंतु, पत्रकारितेमध्ये उस्मानाबाद जिल्ह्याचा इतिहास हा दैदिप्यमान राहिलेला आहे़.

 अतिशय प्रतिकुल स्थितीमध्ये येथील पत्रकारांनी पत्रकारितेचा वसा टिकविण्याचे काम केले आहे़ व्यंकटेश (आबा) हंबीरे यांनी दैनिक संघर्षच्या माध्यमातून स्वत: पत्रकारितेत एक अढळ स्थान निर्माण तर केलेच परंतु, नवीन तरुण, होतकरु युवकांना पत्रकारितेची संधी देवून अनेक वृत्तपत्रात काम करण्याची संधी मिळवून दिली़ आबांचा ‘संघर्ष’ म्हणजे अनेकांसाठी पत्रकारितेची कार्यशाळाच ठरली़ छायाचित्रकार अर्थात फोटोग्राफरच्या माध्यमातून नंदकिशोर ऊर्फ भाऊसाहेब भन्साळी यांनीही पत्रकारिता आणि प्रेस फोटोग्राफी यामध्ये मोठे नाव कमविले़ .
जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष म्हणून भाऊसाहेब भन्साळी यांची यशस्वी कारकीर्द राहिली़ वृत्तपत्रांना लागणारे बहुतांश फोटो श्री भन्साळी यांनी पुरविण्याचे काम केले़ फोटोग्राफी मधील सगळ्या अत्याधुनिक यंत्रसामुग्री, तंत्रज्ञान उस्मानाबाद सारख्या अविकसित जिल्ह्यात आणण्याचा प्रयत्न केला़ अनेकांना वृत्तपत्रामध्ये छायाचित्रकार म्हणून घडविण्याचे काम केले़ नंदकिशोर मंत्री यांच्या नावातच ‘मंत्री’ होते़ तरीही व्यवसाय, उद्योग सांभाळून अखेरच्या क्षणापर्यंत पत्रकारितेचा वसा जोपासला़ नगरसेवक, माजी नगराध्यक्ष अशा राजकीय दृष्ट्या अत्यंत महत्वपूर्ण पदावर काम करुन देखील पत्रकारितेशी जोडलेली नाळ श्री मंत्री यांनी कधीच तुटू दिली नाही़ दैनिक संचार या वृत्तपत्रामध्ये अनेक वर्षे श्री मंत्री यांनी पत्रकारिता जोपासली़.


 दोन वर्षांपुर्वीच पत्रकार महर्षी व्यंकटेश (आबा) हंबीरे यांचे  निधन झाले़ त्यांच्या निधनाने पत्रकारितेची खूप मोठी हानी झाली.

 कोरोनाच्या या महामारीत कै़ हंबीरे यांच्यापाठोपाठ श्री भन्साळी यांचे निधन झाले़ पत्रकारितेतील फोटोग्राफी निखळली असतानाच नंदकिशार मंत्री यांचे निधन झाले़ ज्येष्ठ पत्रकारांच्या अशा अकाली निधनाने पत्रकारितेची अपरिमित हानी होत असताना दैनिक राजधर्मचे जिल्हा प्रतिनिधी, अतिशय निर्मळ मनाचा पत्रकार हरिश्चंद्र धावारे यांचे कोरोनाची लागण झाल्याने निधन झाले़. श्री धावारे यांच्या निधनाच्या धक्यातून सावरत असतानाच उस्मानाबाद जिल्ह्यातील पत्रकारितेचा आधारवड म्हणून ओळखल्या जाणा-या मोतीचंद बेदमुथा यांना मृत्यूने गाठले़. मागील काही दिवसांपूर्वी त्यांना कोरोनाची लागण झाली होती़ हैद्राबाद येथे रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते़ मृत्यूशी झुंज देत अखेर प्राणज्योत मालवली़ श्री बेदमुथा हे ४० वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत होते़. जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष, महाराष्ट्र टाईम्सचे जिल्हा प्रतिनिधी, दैनिक समय सारथीचे संस्थापक संपादक म्हणून त्यांची यशस्वी कारकिर्द उस्मानाबाद जिल्ह्याच्या पत्रकारितेत अमर राहणारी ठरली़. श्री हंबीरे, श्री़ मंत्री, श्री भन्साळी, श्री बेदमुथा या सर्वच जेष्ठ पत्रकारांनी उस्मानाबाद जिल्ह्यातील पत्रकारितेला लोकाश्रय तर प्राप्त करुन दिलाच परंतु, राजाश्रय सुध्दा मिळवून दिला़. या जेष्ठ पत्रकारांनी अतिशय प्रतिकुल स्थितीमध्ये पत्रकारितेचा वसा अतिशय निष्ठेने जोपासल्यानेच आजच्या नव्या, जुन्या सर्वच पत्रकारितेत काम करणा-या पत्रकारांना मान, सन्मान, पद, प्रतिष्ठा, पैसा अशा सर्वच बाबी मिळवून दिल्या हे वास्तव आहे़ .

 

या जेष्ठांची फळी निखळल्याने उस्मानाबाद जिल्ह्याच्या पत्रकारितेची अपरिमित हानी झाली आहे़ .

या सर्व मार्गदर्शक, जेष्ठ आणि श्रेष्ठ पत्रकारांना  पत्रकार संघ, धनंजय रणदिवे यांच्यावतीने भावपूर्ण श्रध्दांजली़.
 
Top