तुळजापूर दि २२ डॉ. सतीश महामुनी
खरीप हंगामासाठी मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांची राष्ट्रीयीकृत बँका आणि सहकारी बँकांकडे पीक कर्ज मागणी होत असताना सर्वच बँकाकडून शेतकऱ्याला कर्ज देण्यास टाळाटाळ करण्यात येत आहे. नुकत्याच एका बैठकीद्वारे जिल्ह्याचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी सर्व बँकांना शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्यासाठी सहकार्य करण्याचे आणि तातडीने कर्ज मंजूर करण्याचे आदेश दिले. तरीही तुळजापूर तालुक्यात शेतकऱ्याला अद्याप पिक कर्ज न दिल्यामुळे शेतकरी वर्गात असंतोष वातावरण आहे.
तुळजापूर तालुक्यात राष्ट्रीय कृत बँक व सहकारी बँका यांच्याकडे मागील दोन महिन्यापासून कर्ज मागणी करण्यासाठी शेतकरी हेलपाटे मारत आहेत. खरीप पिकासाठी आणि वेळी शेतीला खर्च करण्यासाठी आवश्यक असताना वेळेमध्ये कर्ज मिळत नसल्यामुळे शेतकरी नाराज होत आहेत. अनेक वेळा बँकेत चौकशी केली तरीही त्यांना विलंबाने कर्ज वितरण केले जाईल असे सांगितले जात आहे. मात्र वेळेमध्ये कर्ज मिळणे शेतकऱ्याला अपेक्षित आहे. याविषयी जिल्ह्याचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी तुळजापूर शासकीय विश्रामगृह येथे बँक अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन शेतकऱ्यांना कर्ज वितरण करण्यासाठी तातडीने प्रशासकीय कामकाज पूर्ण करण्याचे आदेश दिलेले आहेत.