काटी , दि .२० : 

 तुळजापूर तालुक्यातील काटी येथे शनिवार दि. 21 रोजी सकाळी दहा वाजता खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या सुचनेनुसार महसूलच्या पुरवठा विभागाच्या वतीने तहसीलदार सौदागर तांदळे, पुरवठा निरीक्षक तथा नायब तहसीलदार संदीप जाधव यांच्या उपस्थितीत सावरगाव महसूल मंडळा अंतर्गत  येणाऱ्या गावांसाठी येथील काटी ग्रामपंचायत कार्यालयात रेशनकार्ड संदर्भात शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. 


या शिबिरात रेशनकार्ड संदर्भात समस्या असलेल्या कुटुंबीयांनी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केल्यास त्यांची समस्या या शिबिराच्या माध्यमातून सोडविण्यात येणार आहे. 
अनेकदा रेशनकार्ड संदर्भात नागरिकांना प्रशासकीय कार्यालयांमध्ये चकरा माराव्या लागतात. कागदपत्रांची पूर्तता नसल्याने व अपुरी माहितीमुळे अनेक कुटुंबाचे रेशनकार्ड दुरुस्त होत नाही. तालुका स्तरावर  याबाबत अर्ज प्रलंबित राहत असल्याने खासदार ओमराजे निंबाळकर यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्याअनुषंगाने जिल्हाभर रेशनकार्ड संदर्भात शिबिराचे आयोजन करण्यात येत असून काटी ग्रामपंचायतच्या मागणीनुसार सावरगाव मंडळ व  त्यातील सज्जा अंतर्गत गावातील नागरिकांच्या रेशनकार्ड
संदर्भातील अडचणी जाणून घेऊन त्या रेशनकार्ड शिबिरामार्फत सोडविण्यात येणार आहेत.  

या शिबिरात जिर्ण रेशनकार्ड नवीन करणे, पत्ता बदल करणे, हरवलेले रेशनकार्ड नवीन करणे, रेशनकार्ड विभक्त करणे, रेशनकार्ड मध्ये नाव वाढविणे, कमी करणे आदी कामे होणार असून यासाठी नागरिकांनी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करावी असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
 
Top