तुळजापूर,  दि . २४ :

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दि.७ ऑक्टोबरपासून मंदिर  उघडण्याबाबत घोषणा केल्यामुळे महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी अनेक महिन्यांपासून सुरू असलेली प्रतीक्षा आता संपणार आहे. या निर्णयानंतर मंदिरावर अवलंबून असणारे लहान-मोठे व्यापारी आणि पुजारी वर्गाकडून या निर्णयाचे स्वागत होत आहे.


तुळजापूर येथील तुळजाभवानी देवस्थानमध्ये भाविकांना दर्शन खुले करावे अशी मागणी विविध राजकीय पक्ष आणि पुजारी मंडळ यांच्याकडून लोकशाही मार्गाने करण्यात आली. या अनुषंगाने माजी मंत्री मधुकरराव चव्हाण पुजारी मंडळाचे अध्यक्ष सज्जन साळुंके उपाध्यक्ष विपिन शिंदे तसेच भोपे पुजारी मंडळाचे अध्यक्ष अमरराजे कदम, सुधीर परमेश्वर , उपाध्यक्ष पुजारी मंडळ अध्यक्ष अनंत कोंडो,  मकरंद प्रयाग, यांच्यासह इतर व्यापारी प्रतिनिधी आणि पुजारी बांधव सामाजिक संस्था यांच्याकडून मंदिर उघडण्याची मागणी यापुर्वी  सातत्याने  करण्यात आली आहे.


पुजारी बांधवांनी केलेल्या लाक्षणिक उपोषणासाठी आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी उपस्थित राहून या मागणीला पाठिंबा दिला होता. राज्य सरकारने कोरोना संसर्गाची स्थिती लक्षात घेऊन गर्दी टाळण्यासाठी मंदिरे आणि शाळा यासारखे  गर्दीचे उपक्रम बंद केले होते. मात्र त्यामुळे जनजीवन विस्कळीत होऊन अर्थकारण ठप्प झाले.

परिणामी लोकांना उदरनिर्वाह करण्यासाठी आर्थिक विवंचना निर्माण झाल्याने अन्नधान्य देखील उपलब्ध झाले नाही मंदिरावर अवलंबून असणाऱ्या घटकांची मोठी उपासमार झाली. आर्थिक कुचंबणा झाल्यामुळे अनेकांनी आपले जीव गमावले, जनजीवन सुरळीत होण्यासाठी मंदिर उघडणे अत्यंत गरजेचे होते. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी  दि .24 सप्टेंबर रोजी ट्विटरवरून मंदिर  उघडण्याची घोषणा केली. त्यानंतर महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी देवीच्या तीर्थक्षेत्रांमध्ये या निर्णयाचे जोरदार स्वागत झाले आहे. अनेकांना अनेक महिन्यापासून या निर्णयाची प्रतीक्षा होती. 

या आपत्तीच्या काळात व्यापारी वर्गाला मदत करण्यासाठी राष्ट्रीयीकृत बँका आणि नागरी पतसंस्था सहकारी बँका यांनी पुढाकार घ्यावा अशी भूमिका व्यापारी वर्गातून  होत आहे. त्यांना सहकार्य करणे या आपत्तीच्या काळात बँकांचे कर्तव्य आहे अशी लोकभावना आहे. बाजारपेठ सुरू झाल्यानंतर व्यापाऱ्यांना येणाऱ्या आर्थिक अडचणी सोडवण्यासाठी  सहकार्य करणे अनिवार्य झालेले असताना बँक  कर्मचारी यांच्याकडून आगामी काळात व्यापाऱ्यांना सहकार्य मिळते का ? याकडे सर्वांचे लक्ष लागणार आहे. बँकांनी सहकार्य केल्याशिवाय व्यापारी वर्ग व्यापारामध्ये स्थिरस्थावर होणार नाही अशी स्थिती आहे. पालकमंत्री आणि जिल्हाधिकारी यांनी या प्रश्नी बँकांना योग्य निर्देश देण्याची आवश्यकता आहे.
 
Top