काटी , दि .२८ : उमाजी गायकवाड
तुळजापूर तालुक्यातील काटी पासून अवघ्या ७ किलोमीटर अंतरावरील बार्शी तालुक्यातील सव्वीस गावांसाठी जवळगाव मध्यम प्रकल्प वरदान ठरला आहे. दरम्यान पावसाचे घटते प्रमाण आणि धरण पाणीअधिग्रहण क्षेत्रात झालेले लहानमोठे प्रकल्प यामुळे हे धरण पूर्ण क्षमतेने भरणे अपवादच बनले आहे.
मात्र यंदा पाऊसाचे प्रमाण चांगले राहील्याने गेल्या एकतीस वर्षात पाचव्यांदा धरण भरुन वाहू लागले आहे,त्यामुळे शेतकऱ्यांसह ग्रामस्थ आनंदात आहेत. बार्शी तालुक्यात तीन मध्यम प्रकल्प आहेत. मात्र पावसाच्या अनिश्चिततेमुळे दरवर्षी पाण्यासाठी जनतेला तरसावे लागते. त्यातल्या त्यात जवळगाव मध्यम प्रकल्पाची अवस्था सर्वात जास्त बिकट असून दरवर्षी हे धरण भरण्यास अनेक अडचणी येतात. नागझरी नदीवर उभारण्यात आलेले हे धरण भौगोलिकदृष्टया अत्यंत महत्वाचे आहे.
मात्र लागून असलेल्या उस्मानाबाद जिल्ह्यात पाटबंधारे विभागाची कामे मोठया प्रमाणावर झाली आहेत. त्यामुळे नागझरी नदीवर ठिकठिकाणी पाणी अडवण्यात आले आहे. परीणामी जवळगाव मध्यम प्रकल्पात पाणी पोहचू शकत नाही, त्यात पावसाचेही प्रमाण घटल्याने हे धरण निर्माण झाल्यापासून आत्तापर्यतच्या काळात फक्त पाच वेळाच भरले आहे. त्यामुळे पूर्ण क्षमतेने धरण भरण्याबाबत हे धरण विश्वासू नाही. यंदा मात्र परतीच्या पावसापेक्षा बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्टयाने जवळगाव धरणाच्या अधिग्रहण क्षेत्रातच पावसाने जोरदार हजेरी लावल्याने धरण पूर्ण क्षमतेने भरुन वाहू लागले आहे. 1972-1973 साली जवळगाव मध्यम प्रकल्पाचे काम सुरू झाले होते. पण प्रत्यक्षात 1989 साली पाणी अडवण्यात आले. त्यानंतर चक्क एकोणीस वर्षानंतर 2008 साली पूर्ण क्षमतेने हे धरण भरले. नंतर 2010 साली देखील भरले, पण त्यानंतर पुन्हा सहा वर्षाच्या प्रदीर्घ काळ न भरताच ओलांडला. त्या नंतर 2016 साली भरले. पुन्हा चार वर्ष अनेक कारणांनी धरण भरले नाही, पुन्हा 2020 मध्ये धरण भरले आणि या वर्षी ही भरून वाहत आहे.
त्यामुळे जवळगाव व तुळजापूर तालुक्यातील काटीसह आसपासची सव्वीस गावे आनंदीत आहेत. या धरणामुळे 5340 हेक्टर क्षेत्रावरील जमिनओलीताखाली आली आहे. या धरणाची क्षमता 1233 दशलक्ष घनफूट पाणी साठवण्याची असून 931 दशलक्ष घनफूट पाणी उपयूक्त आहे. या धरणामुळे ज्योतीबाची वाडी, अंबाबाईची वाडी, सारोळे, भांडेगाव, कासारी, भालगाव, मिर्झनपूर, गौडगांव, रुई, आंबेगाव,हत्तीज, हिंगणी, धामणगाव, राळेरास, कौठाळीसह तुळजापूर तालुक्यातील काटी या गावांना अधिक फायदा झाला आहे. गेल्या सव्वीस वर्षात केवळ पाच वेळा भरलेल्या या धरणाने दरवर्षी शेतकऱ्यांना नाराज केले असले तरी या वर्षी चांगलेच खुश केले आहे. यंदाच्या सरासरीप्रमाणे झालेल्या पावसामुळे हे धरण ओसंडून वाहत आहे. या जलाशयावरून तेरा गावे आणि कालव्यावरून तेरा गावे अशी सव्वीस गावे सिंचनाखाली आली आहेत. त्यामुळे यंदा खऱ्या अर्थाने जवळगाव मध्यम प्रकल्प वरदान ठरत आहे. धरण भरल्यामुळे उन्हाळ्यातील सिंचनासह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला असून शेतातील उत्पादन वाढीस मदत होणार असल्याची भावना शेतकरी वर्गातून व्यक्त केली जात आहे.