काटी , दि .२९ 

तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी येथील साठवण तलावाचा सांडवा पावसामुळे फुटल्याने तलाव फुटण्याच्या शक्यतेने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झालेआहे. 

गेल्या चार दिवसांपासून तामलवाडी परिसरात मुसळधार पाऊस कोसळत आहे. परिसरातील सर्वच तलाव पूर्ण क्षमतेने भरले आहेत. 
तामलवाडी, सुरतगाव, पिंपळा बु., पिंपळा खु. आदी गावातील शेतकर्‍यांच्या शेतीसाठी व परिसरातील नागरिकांना पिण्याचे पाणी मिळावे या हेतूने माजी पशुसंवर्धन मंत्री मधुकरराव चव्हाण, माजी पाटबंधारे मंत्री पद्सिंह पाटील यांनी या तलावाची निर्मिती केली होती. या तलावातील पाण्याचा फायदा पंचक्रोशीतील शेतकऱ्यांसह आजू-बाजूच्या कारखान्यांना होत आहे. गेल्या 2 वर्षांपासून या तलावाच्या  पाणलोट  क्षेत्रात चांगला पाऊस पडत असल्याने हा तलाव ओसंडून वाहत आहे. वरून येणाऱ्या पाण्याचा प्रवाह मोठा असल्याने गतवर्षी तर तलावाच्या वरून पाणी वाहून गेले होते. यामुळे गतवर्षीही नागरिकांनी या तलावाच्या डागडुजीसाठी पाटबंधारे विभागाकडे मागणी केली होती. 


गतवर्षी दुर्लक्ष केल्याने आणि यावर्षीही मोठा पाऊस झाल्याने चक्क साठवण तलावाचा सांडवाच फुटून गेला आहे. याबाबत सांडवा फुटल्याचा व्हिडिओही तालुका, जिल्ह्यात व्हायरल झाला आहे. जास्तीचा पाऊस पडल्यावर याचा काही धोका तर होणार नाही ना? याची भीती गावकऱ्यांमधून व्यक्त  केली जात आहे. यामुळे आता जिल्हाधिकांऱ्यानी याकडे लक्ष देण्याची मागणी नागरिकांतून होत आहे
 
Top