नळदुर्ग ,दि . १५ :
येथील उपजिल्हारुग्णालय तात्काळ सुरु करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आता पर्यंत आक्रमक पद्धतीने पाच आंदोलने केली आहेत.थेट मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री यांच्याकड़े पाठपुरावा केला होता,परंतु अद्यापपर्यंत हे रुग्णालय सुरु झाले नाही .
नळदुर्ग हे ऐतिहासिक शहर असून जवळपास ७० गावातील नागरिकांचा दैनंदिन व्यवहार हा शहराशी निगडित आहे .शिवाय दोन राष्ट्रीय महामार्ग लाभलेले हे शहर असून या महामार्गावर सतत अपघात होतात .अपघात झाल्यानंतर वेळेत उपचार न झाल्याने अनेकांचा जीव गेला आहे .हे रुग्णालय सुरु झाल्यास शहरासह जवळपास दीड लाख नागरिकांना आरोग्य सेवेचा लाभ मिळणार आहे.रुग्णालयाच्या इमारतीचे काम पूर्ण झाले असून,स्टाफ सुद्धा नेमला आहे, तरी ही रुग्णालय सुरु होत नाही. प्रशासन जाणिवपूर्वक दुर्लक्ष करत आहे.
याबाबतची सर्व माहिती व आता पर्यंत केलेला पाठपुरावा यांची माहिती मनसेच्या पदाधिका-यानी, मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांना संभाजीनगर (औरंगाबाद ) येथे भेटून दिली . याबाबत संबंधित विभागास व प्रशासनाला हे रुग्णालय तात्काळ सुरु करण्याच्या सूचना देऊन नळदुर्ग व परिसरातील नागरिकांची हेळसांड थांबवावी अशी विनंती मनसे जिल्हाध्यक्ष प्रशांत नवगिरे, जिल्हा सचिव ज्योतिबा येडगे,जिल्हा उपाध्यक्ष महेश जाधव,शहराध्यक्ष अलिम शेख,शहर सरचिटणीस प्रमोद कुलकर्णी यांनी केली आहे.