तुळजापूर  दि ०६

  तुळजाभवानी मंदिरासमोर भाविकांना त्रास देणाऱ्या  जबरदस्तीने भीक मागणाऱ्या मुले आणि महिला यांचा बंदोबस्त करण्याची मागणी उस्मानाबाद जिल्हा महिला व बालकल्याण अधिकारी सुनील अंकुश यांच्याकडे निवेदनाद्वारे आमदार संवाद मंच यांच्या शिष्टमंडळाने केली आहे. 


जिल्हा महिला व बाल कल्याण अधिकारी सुनील अंकुश यांना आमदार संवाद मंच अध्यक्ष डॉ. सतीश महामुनी, मधुकरराव चव्हाण यांचे स्वीय सहाय्यक बबनराव जाधव ,तुळजापूर तालुका रुग्ण सेवा समितीचे सदस्य आनंद कंदले, भाजपचे जिल्हा चिटणीस गुलचंद व्यवहारे , काँग्रेस सेवादलाचे तालुकाध्यक्ष तानाजी जाधव, समाजसेवक संजयकुमार बोंदर, पत्रकार संजय गायकवाड सामाजिक कार्यकर्ते फरीद शेख यांच्या शिष्टमंडळाने तुळजाभवानी मंदिरासमोर असणाऱ्या  भिकाऱ्याच्या समस्यांच्या अनुषंगाने महिला व बालकल्याण विभाग, बाल संरक्षण समिती, बाल हक्क आयोग, पोलीस प्रशासन आणि नगरपरिषद प्रशासन यांच्याकडून संयुक्तपणे शाळाबाह्य मुलांना रस्त्यावर भीक मागत असताना ताब्यात घेऊन त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासनाच्या निर्णयाप्रमाणे योग्य ती कार्यवाही करण्यात यावी. ही कार्यवाही सातत्याने केल्यास शिवाय मंदिरासमोरील भिकाऱ्याची समस्या दूर होणार नाही असा मुद्दा महिला व बालकल्याण अधिकाऱ्यासमोर उपस्थित केला.

भाविकांना झोंबझोंबी करणे आणि जबरदस्तीने भीक मागणे यामुळे नवदाम्पत्य आणि भावीक भक्तांमध्ये घबराटीचे वातावरण आहे. अशा विचित्र पद्धतीने भिक मागण्यामुळे येथील तीर्थक्षेत्राची दररोज बदनामी होत आहे. मंदिर संस्थानचे चेअरमन जिल्हाधिकारी असतानादेखील अशाप्रकारची भीक मागण्याची पद्धत प्रशासनाकडून बंद होत नसेल तर आमदार संवाद मंच रस्त्यावर उतरून आंदोलन करेल असा इशारा याप्रसंगी शिष्टमंडळाने महिला व बालकल्याण अधिकारी यांना दिला.

याप्रसंगी महिला व बालकल्याण अधिकारी आपण नव्याने पदभार घेतला आहे. समाजसेवक संजय कुमार बोंदर यांच्याकडून वेळोवेळी याविषयी माहिती मिळाली आहे. पुढील आठवड्यामध्ये रेस्क्यू ऑपरेशन करण्यासाठी महिला व बालकल्याण विभाग कार्य करीत आहे अशी माहिती देण्यात आली. आमदार संवाद मंचकडून आनंद कंदले व बबनराव जाधव यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी कायदे विषयक चर्चा केली. तर या समस्येशी मागील तीन वर्षापासून संघर्ष करणारे समाजसेवक संजय कुमार बोंदर यांनी यापूर्वी करण्यात आलेला पत्रव्यवहार आणि प्रशासनाकडून झालेल्या चुका त्याचबरोबर रेस्क्यू ऑपरेशन  याविषयी सविस्तर माहिती सांगितली. या प्रश्नांमध्ये महिला व बालकल्याण विभागाने निर्णायाक भूमिका बजावण्यासाठी पूर्वतयारी करावी आणि सातत्याने रेस्क्यू ऑपरेशन राबवावे अशी मागणी यावेळी काँग्रेस सेवादलाचे अध्यक्ष तानाजी जाधव यांनी केली. शिष्टमंडळाला आठ दिवसात कारवाई करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. 
 
Top