नळदुर्ग,दि.१३
     
राष्ट्रवादाच्या नावाखाली देशात सध्या परस्पर विद्वेष वाढविणाऱ्या व सामाजिक ऐक्याला तडे देणाऱ्या घटना घडवल्या जात आहेत .आर्थिक क्षेत्रात वाढती महागाई व बेरोजगारी यासारख्या समस्या बळावत आहेत. तेव्हा देशाला आता निधर्म वृत्ती पेरणाऱ्या विज्ञानवादी ,आर्थिक व समताधिष्ठीत राष्ट्रवादाची गरज आहे असे मत ज्येष्ठ समाजवादी विचारवंत पन्नालाल सुराणा यांनी बोलताना व्यक्त केले. 

तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग येथे राष्ट्र सेवा दल संचलित आपलं घरच्या वतीने " राष्ट्रवाद " या विषयावर दोन दिवसीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून सुराणा बोलत होते .पुढे बोलताना ते म्हणाले की , स्वातंत्र्य , समता ,बंधुता व सामाजिक न्याय या तत्त्वावर आधारलेला राष्ट्रवाद समाजवाद लोकशाही , धर्मनिरपेक्षता , विज्ञानवाद व आर्थिक समानता या गोष्टी राष्ट्र उभारण्यासाठी महत्त्वाच्या मानल्या .तो विचार आजच्या युवकांनी आत्मसात करणे गरजेचे असल्याचे ही त्यांनी सांगितले .तर राष्ट्रवादाची मूळ संकल्पना व एकूणच लेखाजोखा मास्टर दिनानाथ मंगेशकर महाविद्यालय औराद शहाजनी येथील प्रा . डॉ .अशोक नारनवरे यांनी यावेळी  विवेकवादी , उदारमतवादी , बुद्धीप्रामाण्यवादी राष्ट्रवाद सध्या आवश्यक असून त्यातून मानवी हक्काची जोपासना , सर्वधर्मसमभाव या गोष्टी वाढीस लागण्यास मोठी मदत होते असेही त्यांनी सांगितले.
                           

राष्ट्रसेवादल आपलं घर प्रकल्प नळदुर्ग येथे सोलापूर, लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यातील सेवा दल सैनिकांसाठी दिनांक १० व ११ सप्टेंबर २२ रोजी "राष्ट्रवाद" महत्त्वपूर्ण विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले. या चर्चासत्रात विषय मांडणी व मार्गदर्शक म्हणून साथी पनालाल सुराणा ,प्रा. डॉ. अशोक नारनवरे   यांनी "राष्ट्रवादाच्या" चढत्या आलेखाचा लेखाजोखा मांडला. कार्यकर्त्यांनीही हा विषय तन्मयतेने समजून घेऊन प्रश्न उत्तरे केली.  "समाजवाद व आर्थिक प्रश्न" याविषयी मांडणी करून सविस्तर, सखोल असे मार्गदर्शन केले.
               

 दोन्ही दिवसात अतिशय सोप्या सखोल सविस्तर व्याख्यानाचा पुरेपूर आनंद कार्यकर्त्यांनी घेऊन प्रश्न उत्तरे रूपाने चर्चा केली व आपली मनोगते मांडली. या चर्चासत्रामध्ये  सोलापूर, लातूर, उस्मानाबाद तीन जिल्ह्यातील एकूण 45 सेवादल सैनिकांनी उस्फुर्त सहभाग नोंदवला. या कार्यक्रमाचे संयोजक आपलं घरचे सचिव गुंडू पवार , व्यवस्थापक विलास वकील , सरिता उपासे, शिला मुदगुडे उमरगा.निजगुण स्वामी,येणगुर. परिवर्तनचे मारुती बनसोडे ,  विजय शिंदे ,मोहन काळे   उस्मानाबाद जिल्ह्यातील अँड वाघाळे, अँड. कल्पना निपाणीकर, व इतर मान्यवर सेवादल सैनिकांनी  सहभाग नोंदवला.
           प्रारंभी कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिक्षक भारतीचे जिल्हाध्यक्ष भैरवनाथ कानडे यांनी तर पाहुण्यांचा परिचय रामकुमार रायवाडीकर यांनी करून दिला.
       
 
Top