काटी,दि. २५: उमाजी गायकवाड
तुळजापूर तालुक्यातील वडगाव (काटी) येथील प्रगतिशील द्राक्ष बागायतदार शेतकरी हणमंत भानुदास गवळी यांनी वडगाव (काटी) शिवारात खडकाळ माळरानावर द्राक्षांचे उत्पादन घेऊन सहाशे टन द्राक्ष परदेशात निर्यात केली.
सातत्याने निर्यातक्षम द्राक्षाचे उत्पादन घेऊन जागतिक बाजारपेठेत आपल्या मालाची विक्री केल्याबद्दल त्यांच्या उत्पादनाची दखल घेऊन अमेरिकेच्या ग्लोबल ह्युमन राईट कौन्सिल फॉर पीस ॲंड सस्टेनबल डेव्हलपमेंट या जागतिक पातळीवरील संस्थेचा 'एशिया पॅसिफिक आयकॉनिक अवार्ड' देऊन सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार विविध मान्यवरांच्या उपस्थितीत नवी दिल्ली येथे प्रदान करण्यात आला.
निसर्गावर अवलंबून असलेले द्राक्षांसारखे खर्चिक पीक पुर्णतः हवामानावर अवलंबून असताना प्रगतशील शेतकरी हणमंत गवळी यांनी खडकाळ माळरानावर उत्पादित केलेली 600 टन द्राक्षे परदेशात निर्यात केली. शेती क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेऊन हा पुरस्कार देण्यात आला. या पुरस्कार वितरण सोहळ्यात उमरगा तालुक्यातील किल्लारी येथील राजाराम जाधव यांनाही पुरस्कार देण्यात आला.
त्यांना मिळालेल्या पुरस्कारांबद्दल वडगाव (काटी) व परिसरातील शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी आणि स्फुर्तिदायक ठरत असून सर्वत्र कौतुक होत आहे.