७ वी पास काटीचे सुपुत्र बळी ढगे भाजी विकून बनला करोडपती...
५ हजार रुपयांत सुरू केला स्टार्टअप, आज  हजारांहून अधिक ग्राहक

काटी , दि.०५ : उमाजी गायकवाड 


तुळजापूर तालुक्यातील काटी येथील सुपुत्र बळीराम उर्फ बळी हणमंत ढगे हा पुणे कोथरूड भागातील सुप्रसिद्ध भाजीपाला विक्रेता असून त्याच्या भाजीपाला, फ्रुट व फुड्स विक्री स्टॉलला रविवार दि. 30 जुलै रोजी पत्रकार उमाजी गायकवाड व जागतिक किक बॉक्सिंग पट्टु वडगाव (काटी) चे सुपुत्र जयदेव म्हमाने यांनी सदिच्छा भेट दिली.

सातवी पास बळी ढगेच्या भाजीपाला, फ्रुट व फुड्स  व्यवसायाचा कोथरुड भागातील बाजारात पसारा चांगलाच वाढला आहे. 

तुळजापूर तालुक्यातील काटी सारख्या छोट्या खेड्यातील ग्रामीण भागातील बळी ढगेचा संघर्षमय प्रवास खरोखरच थक्क करणारा आहे. बळीने 1985 ला अंगावरच्या कपड्यांनशी गाव सोडले. म्हणजे जवळपास 38 वर्षे झाले. सुरुवातीला ट्रकवर क्लिनर म्हणून काम केले. त्यानंतर त्याने मुंबईत 1987 ते 88 या कालावधीत  मुंबईमध्ये एका वर्कशॉपमध्ये कामाला सुरुवात केली. काही काळ दुग्धव्यवसाय घरोघरी जाऊन केला. त्यानंतर 32 वर्षांपूर्वी पुणे गाठले. पुण्यात आल्यानंतर पुण्यातील सुप्रसिद्ध चितळे मिठाई  स्वीट्समध्ये काम केले. सुमारे 18 वर्षे चितळे मिठाई स्वीट्समध्ये काम करुन 14 वर्षापुर्वी स्वतः चे कोथरुड पुणे येथे अथर्व व्हिजिटेबल,फ्रुट ॲंन्ड फुड्सचा छोटासा व्यवसाय सुरु केला. 


आज बळीराम ढगेने कोथरूड भागात अथर्व व्हिजिटेबल, फ्रुट ॲंन्ड फुड्स विक्रिच्या माध्यमातून चांगलेच नाव कमावत आपले बस्तान बसवले. आज 45 वर्षे असलेला बळी ढगे हा केवळ 7वी पास आहे. आज तो स्टॉलसह ऑनलाइन भाजी विकून वर्षाला सुमारे 3 कोटींची उलाढाल करतो आहे. निव्वळ नफा 30% म्हणजे थोडाथोडका नव्हे तर सुमारे सव्वा ते दिड कोटींचा नफा बळी कमावतो आहे.
 
एरवी अनेकांना चांगले शिक्षण घेऊनही नोकरी मिळत नाही किंवा करियरमध्ये यश  मिळत नाही. मात्र तुळजापूर तालुक्यातील काटी सारख्या छोट्याशा ग्रामीण भागातील एका सातवी पास तरुणाने आपल्या चिकाटीने फक्त भाजीपाला विकून करोडपती झाल्याच्या त्याचा प्रवास आश्चर्यचकित करणारा आहे.

कोरोना आणि लॉकडाऊनमुळे लोक घरातच अडकले होते. त्यावेळी ऑनलाईन होम डिलिव्हरी सुरु केले. त्याच काळात ऑनलाइन होम डिलिव्हरीची मागणी वाढली. लोक ऑनलाइन भाजी मागवू लागले. ऑनलाईन भाजी विक्रित ग्राहकांमधूनही चांगला प्रतिसाद मिळाला. सर्व भाज्या घरपोच आणि बाजारभावात मिळाल्यावर ग्राहकदेखील खूश होते. या कामात त्यांची अर्धांगिनी असलेल्या अर्चना बळीराम ढगे यांनी घर सांभाळून  मुलांचे शिक्षण व व्यवसायतही चांगला हातभार लावला. या यशात माझ्या बायकोचाही सिंहाचा वाटा असल्याचे बळीराम ढगे यांनी आवर्जून सांगितले.

आज बळीचे कोथरूड येथे तीन मजली स्वतः चे घर असून 7 नोकर दुकानात कामाला आहे. थोरला मुलगा अथर्व याने कला शाखेतील पदवी घेतली असून तो उत्तम लेखक, कवि, व साहित्यिक आहे. त्याचा एक कविता संग्रहाचे पुस्तकही प्रकाशित झाले आहे. तर दुसरा मुलगा ओंकार बळीराम ढगे हा कॉम्प्युटर इंजिनियरिंगचे शिक्षण घेत आहे. आता तर बळीरामचा व्यवसाय चांगला वाढला आहे. त्याची दोन्ही मुले देखील शिक्षण घेत आपल्या वडिलांना चांगला हातभार लावत आहेत. ग्रामीण भागातील या युवकाचे अतिशय कठोर परिश्रमातून कमावलेल्या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
 
Top