सास्तुर येथील स्पर्श ग्रामीण रुग्णालयास प्रतिष्ठेचा राज्यस्तरीय कायाकल्प द्वितीय पुरस्कार जाहीर
लोहारा ,दि.१८
केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी स्वच्छ भारत अभियान अंतर्गत रुग्णालयासाठी प्रतिष्ठेचा असलेला सन २०२२-२३ चा सास्तुर (ता. लोहारा) येथील स्पर्श ग्रामीण रुग्णालयास महाराष्ट्रातून व्दितीय क्रमांकाचा राज्यस्तरीय कायाकल्प पुरस्कार जाहीर झाला आहे. १० लक्ष रुपये व सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
कायाकल्प मूल्यांकन पद्धतीमध्ये अतिशय सूक्ष्मपणे रुग्णालयाचे मूल्यमापन केले जाते. यामध्ये रुग्णालयाची देखभाल व स्वच्छता, जंतुसंसर्ग नियंत्रण, जैव वैद्यकीय कचरा विल्हेवाट व्यवस्थापन, रुग्णालयाबाहेर जनतेसाठी दिल्या जाणार्या सुविधा, आरोग्य कर्मचार्याचे प्रशिक्षण, शस्त्रक्रियागृह, बाह्यरुग्ण व अंतरुग्णविभागातील सोई सुविधा व पर्यावरण संतुलनासाठी इको फ्रेंडली साधनांचा वापर इत्यादी प्रकाराने रुग्णालयाचे मूल्यमापन केले जाते. चार पातळीवर मूल्यमापन करून सर्वाधिक गुणांकन प्राप्त संस्थेस महाराष्ट्र पातळीवर प्रथम व व्दितीय क्रमांकाचे कायाकल्प पुरस्कार जाहीर केले जातात. सन २०२२-२३ करिताचा १०० पैकी ९९.७१% गुणांकन मिळवत स्पर्श ग्रामीण रुग्णालय राज्यपातळीवर व्दितीय क्रमांकाचे परितोषिक विजेते ठरले आहे. विशेष म्हणजे सदर पुरस्कार दोन वेळेस स्पर्शला प्राप्त झाला आहे. यामधून स्पर्शच्या कामातील सातत्य, दर्जेदार आरोग्य सुविधा व रुग्णांना सन्मानजनक आरोग्य सुविधा पुरविल्याचे दिसून येते. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. ईस्माईल मुल्ला व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सतीश हरिदास यांच्या सततच्या मार्गदर्शन व उत्कृष्ट नियोजनामुळे व चांगल्या कामाच्या पाठीशी भक्कम साथ यामुळे धाराशिव जिल्ह्याला हा सन्मान प्राप्त झाला आहे.
बाह्य रुग्ण विभागात दररोज किमान ३५० च्या वर रुग्णांची तपासणी होते तसेच ३० खाटांच्या या रुग्णालयाचा बेड अकुपन्सी दर दरमहा १३० टक्केच्या वर असतो. दरमहा कमीत कमी १०० मोठ्या शस्त्रक्रिया, १५० वर बाळंतपणे त्यामध्ये अतिजोखामिच्या मातांचे दरमहा ४० ते ५० सिझेरियन शस्त्रक्रिया केल्या जातात तसेच अद्यावत नवजात शिशु स्थिरीकरण कक्ष उपलब्ध असून या सर्व सुविधा मोफत उपलब्ध आहेत. अद्यावत उपकरणयुक्त प्रयोगशाळेत सर्व प्रकरच्या तपासण्या संपूर्ण मोफत व तात्काळ रिपोर्ट, डिजिटल क्ष-किरण विभाग, मॉडूलर शस्त्रक्रियागृह व मॉडूलर प्रसूतीगृह, रक्त साठवण केंद्र. सर्व सुविधा युक्त अद्ययावत प्रसूती पश्चात कक्ष. दररोज हेल्थ टॉक द्वारे प्रसुतीपूर्व, प्रसूतीपश्चात घ्यावयाची मातेची व बाळाची काळजी या विषयी मार्गदर्शन व त्यासंबंधीच्या सोप्या भाषेतील माहितीपुस्तिका मातांना दिल्या जातात. मातेसाठी सकस आहार म्हणून किमान एक महिना पुरेल इतका गूळ शेंगदाणे लाडू बाळासाठी बेबी किट दिले जातात. त्यामुळे प्रत्येक मातेंना स्पर्श हे आपले माहेर घर असल्याची भावना निर्माण होते त्यामुळेच जवळपास ३८४ गावामधून रुग्ण स्पर्शच्या आरोग्य सेवेचा लाभ घेतात.
स्पर्शला आजपर्यंत अनेक पुरस्काराने सन्मानित
स्पर्श ग्रामीण रुग्णालयास राज्य व देश पातळीवरील अनेक पुरस्कार मिळाले आहेत यात दर्जेदार आरोग्य सेवेसाठी महाराष्ट्र शासना तर्फे दिला जाणारा डॉ.आनंदीबाई जोशी गौरव पुरस्कार राज्यात प्रथम क्रमांकाने ३ वेळा प्राप्त झाला आहे माता बाल संगोपनासाठी शासना तर्फे दिला जाणारा राज्यात प्रथम क्रमांकाचा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार, राष्ट्रीय दर्जा गुणवत्ता हमी मानांकन (एन.क्यु.ए. एस) पुरस्कार प्राप्त स्पर्श हे राज्यातील एकमेव ग्रामीण रुग्णालय आहे. प्रसूतीपूर्व व प्रसूतीपश्चात दर्जेदार आरोग्य सेवेसाठीचे राष्ट्रीय पातळीवरील (लक्ष) मानांकित ग्रामीण रुग्णालय आहे. राज्यशासना तर्फे सुरु करण्यात आलेल्या प्रत्येक जिल्ह्यासाठीचा सुंदर माझा दवाखाना जिल्ह्यात प्रथम क्रमांकाचा पुरस्कार, उत्कृष्ट आरोग्य सेवेसाठीचा मराठवाडा भूषण पुरस्कार व इतर अनेक पुरस्कार प्राप्त आहेत. (आय. एस.ओ) प्रमाणित या ग्रामीण रुग्णालयास केंद्रीय रिव्ह्यू मिशनने स्पर्श हे उत्कृष्ट रोल मॉडेल असून देश पातळीवर असे रोल मॉडेल तयार व्हावेत असे आपल्या अहवालात नमूद केले आहे.
राजस्तरीय कायाकल्प पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल सर्व स्तरातून ग्रामीण रुग्णालय स्पर्शचे कौतुक होत आहे.
“पूरस्कार चांगली आरोग्य सेवा देण्याची उभारी देतात. रमाकांत जोशी, प्रकल्प व्यवस्थापक, स्पर्श ग्रामीण रुग्णालय, सास्तुर
ग्रामीण रुग्णालय स्पर्श सास्तूरला राज्यापातळीवरील प्रतिष्ठेचा कायाकल्प व्दितीय क्रमांकाचा पुरस्कार दुसऱ्यांदा प्राप्त झाला आहे. हा धाराशिव जिल्यातील आरोग्य सेवेचा खऱ्या अर्थाने सन्मान आहे. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. ईस्माईल मुल्ला व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सतीश हरिदास यांच्या सततच्या मार्गदर्शन व प्रेरणेमुळे धाराशिव जिल्ह्याला स्पर्श ग्रामीण रुग्णालयाच्या रूपाने हा सन्मान प्राप्त झाला आहे. संपूर्ण स्पर्शच्या टीमने कामातील सातत्य, सकारात्मक दृष्टीकोन व आरोग्य सेवा हाच मानव धर्म मानल्यामुळे हा पुरस्कार प्राप्त झाला. या सर्वांचा मला अभिमान वाटतो त्यांच्या कामावरील निष्ठेमुळे स्पर्श च्या आरोग्य सेवेच्या पॅटर्णची दखल संपूर्ण राज्याने घेतली आहे. या पुरस्कारामुळे आणखी चांगली आरोग्य सेवा देण्याची जबाबदारी वाढली आहे. स्पर्शच्या संपूर्ण टीमवर्कच्या साह्याने तळागाळातील गोरगरीब ग्रामीण जनतेस आणखी चांगली आरोग्य सेवा देऊ हा विश्वास आहे.