बोरी धरणातून अवैध पाणी उपसा सुरूच,भरारी पथकाचे दुर्लक्ष,संबंधिताचे निलंबन करावे जिल्हाधिका-यांकडे मनसेची मागणी
नळदुर्ग,दि.०२ :
नळदुर्ग शहरातील बोरी (कुरनूर मध्यम प्रकल्प) धरणात मासेमारी जोमाने सुरु आहे.तर अवैध पाणी उपसा सुरूच असुन भरारी पथकाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करुन याप्रकरणी संबंधितास निलंबित करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने निवेदनाव्दारे जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.
येथील बोरी धरणातून नळदुर्ग शहर,तीर्थक्षेत्र तुळजापूर,अणदूर व इतर दोन-तीन गावांना पाणीपुरवठा केला जातो,सद्या धरणात अत्यल्प पाणी साठा असून येत्या काही दिवसात पाणी टंचाई होऊन भीषण परिस्थिती निर्माण होईल. याचे गांभीर्य समजून तहसील कार्यालयाने 28 ऑगस्ट 2023 रोजी एक भरारी पथक नियुक्त करून बोरी धरणातून अवैध पाणी उपसा करणाऱ्याचे विद्युत पंप जप्त करून कार्यवाही करावी यासाठी,तलाठी,मंडळ अधिकारी,महावितरणचे अधिकारी,पोलीस कर्मचारी,पाटबंधारे विभाग,यातील कर्मचारी यांची नियुक्ती केली आहे.
परंतु गेल्या सहा महिन्यात या भरारी पथकाकडून कोणतीही कामगिरी झाल्याचे दिसत नाही,या पथकातील अधिकारी व कर्मचारी हातावर हात ठेवून एकमेकांकडे बोट दाखविण्याचे काम करत आहेत,त्यातच धरणात मोठ्या प्रमाणात मासेमारी हि होत आहे,अत्यल्प पाणीसाठा असल्यामुळे बोटीद्वारे मासेमारी होत असताना पाण्याखालील गाळ ढवळून वरती येत आहे,तेच पाणी पुढे पिण्यासाठी नागरिकांना मिळत आहे,यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे.
जिल्हाधिकारी यांच्या आदेशाची पायमल्ली करत भरारी पथक आदेशाची थट्टाच करत आहे,एवढ्या मोठ्या लोकसंख्या असलेल्या दोन शहराची व इतर तीन गावाची तहान भागविणाऱ्या बोरी धरणातून अवैध पाणी उपसा होत असताना व मासेमारी होऊन पाणी गढूळ होत असताना संबंधित विभाग व भरारी पथक नेमके करतयं काय?असा प्रश्न पडत आहे. जिल्हाधिकारी यांच्या आदेशाची पायमल्ली करून बघ्याची भूमिका घेणाऱ्या भरारी पथकातील सर्वच अधिकारी व कर्मचाऱ्यावर तात्काळ निलंबणाची कार्यवाही करावी अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना तीव्र आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही असे जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे.
या निवेदनावर जिल्हा उपाध्यक्ष महेश जाधव,जिल्हा सचिव ज्योतिबा येडगे,शहराध्यक्ष अलिम शेख,शहर सरचिटणीस प्रमोद कुलकर्णी,शहर उपाध्यक्ष रमेश घोडके,शहर संघटक रवि राठोड यांच्या स्वाक्ष-या आहेत.