पस्तीस वर्षानंतर स्नेहमेळाव्यात रमले दहावीचे विद्यार्थी; जि. प. प्रशाला नंदगांव येथे माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात
वागदरी (एस.के.गायकवाड):
जि. प. प्रशाला नंदगांव, ता. तुळजापूर, जि. धाराशिव येथील १९८८-८९ मधील इयत्ता दहावीच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात संपन्न झाला.
कार्यक्रमाची सुरुवात प्रार्थनेने झाली.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रशालेचे माजी शिक्षक व निवृत्त विस्ताराधिकारी श्री. बाबूराव पडसलगे होते. यावेळी माजी शिक्षक श्री. प्रभाकर उपासे, श्री. गुरुनाथ मुळे, श्री. अशोक धुमाळ, श्री. रामचंद्र बुरगुटे, श्री. शिवाजी वऱ्हाडे, माजी सरपंच श्री. सिद्धेश्वर कोरे, शालेय समिती अध्यक्ष श्री. सागर पाटील आदी उपस्थित होते.
प्रशालेचे माजी विद्यार्थी डॉ. सतीश कुलकर्णी यांनी कार्यक्रमाच्या प्रास्ताविकेत सांगितले की, जि. प. प्रशाला नंदगांव या शाळेतील शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळेच आज अनेक विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रात आपला नावलौकिक प्रस्थापित केला आहे.
पस्तीस वर्षांनी भेटलेल्या या सर्व माजी विद्यार्थ्यांना एकमेकांना भेटून खूप आंनद झाला. यावेळी अनेक माजी विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतात शाळेतील आठवणी सांगितल्या. हा माजी विद्यार्थी संघ केवळ या स्नेहमेळाव्यापुरता मर्यादित न राहता, भविष्यात आपल्या समस्या सोडवण्यासाठी एकमेकांना सहकार्य करावे अशी भावना व्यक्त केली.
तर माजी शिक्षकांनी आपल्या मनोगतात सांगितले की, आजच्या या स्नेहमेळाव्यामुळे आमच्या भूतकाळातील सुखद आठवणींना उजाळा मिळाला आहे. आमचे विद्यार्थी मोठे होताना आम्हाला खूप आनंद होतोय अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
या स्नेहमेळाव्यासाठी मुंबई, पुणे, सोलापूर आदी शहरातून जवळपास पन्नास माजी विद्यार्थी आणि विद्यार्थीनी उपस्थित होते. सर्व माजी शिक्षक आणि विद्यार्थ्यांना स्नेहमेळाव्याचे स्मृतीचिन्ह देऊन गौरविण्यात आले. यावेळी माजी विद्यार्थीनींना शाळेतील आठवणी सांगिताना गहिवरून आले होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सतीश कुलकर्णी यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी माजी विद्यार्थी कल्याणी कोरे, नजीर शेख, विलास जेवळे, सूर्यकांत शरणार्थी, श्रीशैल कट्टे, चंद्रकांत बशेट्टी राजकुमार पाटील आदींनी परिश्रम घेतले.स्नेहभोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली.