मराठीचा वापर, प्रचार व प्रसार करा- भारत सातपुते
अणदुर,दि.२८: चंद्रकांत हागलगुंडे
गुरुवार दि. 27 फेब्रुवारी रोजी जवाहर कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय अणदूर ता.तुळजापूर येथे मराठी विभागाच्या वतीने मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात आला.
याचे उद्घाटन प्रमुख पाहुणे भारत सातपुते यांचे हस्ते कवी कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य उमाकांत चनशेट्टी उपप्राचार्य मा.डॉ. मल्लिनाथ लंगडे मराठी विभाग प्रमुख प्रा.डॉ. संजय कुलकर्णी डॉ.मल्लिनाथ बिराजदार डॉ. प्रसन्न कदंले उपस्थित होते. उमाकांत चनशेट्टी यांच्या हस्ते प्रमुख पाहुणे यांचा सत्कार करण्यात आला.
भारत सातपुते म्हणाले की, मराठी भाषेचा एक दिवसापुरता गौरव न करता आपण दैनंदिन जीवनामध्ये मराठीचा वापर केला पाहिजे. त्याचा प्रसार व प्रचार केला पाहिजे. माझे सगळ्यात जवळचा मित्र म्हणजे पुस्तक आहेत. वाचन करणे मला फार आवडते.म्हणूनच मला कविता, कथा, आत्मचरित्र सारख्या साहित्य प्रकारातून लेखन करता आले. नारायण सुर्वे, दया पवार, कुसुमाग्रज यांचा सहवास मला लाभला त्यांच्या सानिध्यात मी राहिलो. तरीपण माझे पाय मी जमिनीवर ठेवलेले आहेत. सर्वात जास्त इमानदार माणूस जर कोण असेल तर तो न शिकलेला व्यक्ती. मराठीत बघून ओव्या वाचतात आणि न बघता शिव्या देतात अशी एकंदर परिस्थिती आहे.
मराठीमध्ये बरेच शब्द इंग्रजीचे आलेले आहेत. पण त्याचे मराठीकरण झाल्याचा भास होतो. उदा. टेबल, पेन, फ्रिज,टीव्ही. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला म्हणजे पुरेसे नाही तर त्यानंतर काही जो निधी उपलब्ध होईल त्याचा वापर करून मराठी भाषा ही समृद्ध केली पाहिजे. त्याचबरोबर त्यांनी दुकानावरील मराठी पाट्या ज्या लावल्या जातात त्याचेही विडंबन वात्रटिकेतून केले. जुना इतिहास आपल्या हातून पुसला जाणार नाही याची काळजी घ्या असेही ते म्हणाले. मनापासून मराठी भाषेवर व मातीवर प्रेम करा. प्रत्येकाने आपलं काम प्रामाणिकपणाने केलं पाहिजे. विचारांचे दारिद्र्य हटवायचे असेल तर पुस्तकाशिवाय पर्याय नाही. मराठी व्याकरणाचाही अभ्यास केला पाहिजे. त्याशिवाय तुमचं शुद्धलेखन सुधारणार नाही त्याचबरोबर त्यांनी स्वतःच्या जीवनातल्या काही कटू प्रसंग आणि आठवणी सांगितल्या. गरीब परिस्थिती मधून मी आल्यामुळे आजच्या या परिस्थितीची जाणीव मला सतत होताना दिसते. त्यासाठी आपण सर्वांनी आपल्या आहे त्या परिस्थितीमध्ये मधून कसे पुढे जाता येईल याचा विचार करावा असे ते म्हणाले.
अध्यक्ष समारोप करताना उमाकांत चनशेट्टी म्हणाले की, विद्यार्थ्यांनी वाचनाकडे लक्ष दिले पाहिजे. भारत सातपुते यांचे चरित्र जागरण यामध्ये भारत सातपुतेनी जे आपले जीवनातील घटना, प्रसंग सांगितले आहे, त्याचे विश्लेषण केले. गरीब परिस्थिती मध्ये जीवन जगलेले भारत सातपुते आज लेखक म्हणून प्रसिद्ध आहेत. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.डॉ. संजय कुलकर्णी यांनी केले तर आभार डॉ. प्रसन्न कंदले यानी मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. एम. बी. बिराजदार यांनी केले. यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते. वंदे मातरम या गीताने कार्यक्रमाची सांगता झाली.