नळदुर्ग लोहगाव रस्त्याची दुरवस्था, दोन वर्षांपासून काम रखडले, लोकप्रतिनिधीसह सुस्त प्रशासन व संबंधित ठेकेदाराविरुध्द ग्रामस्थांतुन तीव्र संताप
नळदुर्ग,दि.१४:
नळदुर्ग ते लोहगाव (ता.तुळजापूर ) या रस्त्याची दुरवस्था झाली असुन वाहनचालक व प्रवाशांना मोठी कसरत करावी लागत आहे. गेल्या दोन वर्षांपासून रस्त्याचे काम रखडल्याने लोकप्रतिनिधीसह सुस्त प्रशासन व संबंधित ठेकेदाराविरुध्द नागरिकातुन तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. याबाबत आतातरी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी लक्ष घालून तातडीने रस्त्याचे प्रश्न मार्गी लावण्याची मागणी होत आहे.
दरम्यान स्त्यावर पडलेल्या अस्त व्यस्त खडीमुळे व अनेक ठिकाणी अर्धवट पुलाच्या कामामुळे रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाली असून यातून मार्ग काढताना वाहन धारकांना जीवघेणी कसरत करावी लागत आहे. तुळजापूर तालुक्यातील लोहगाव ते नळदुर्ग या रस्त्याचे काम रेंगाळल्यामुळे या मार्गावर सातत्याने अपघात घडत आहेत.त्याचबरोबर रस्त्याच्या दुरावस्थेमुळे एक वर्षापासून एसटी बस सेवा बंद असल्याने शाळकरी विद्यार्थ्यासह नागरिकांना मोठ्या गौरसोयला तोंड दयावे लागत आहे.संबंधित गुत्तेदाराने कांही ठिकाणी पुलाचे काम व रस्त्यावर खडी टाकण्याचे काम केले. रस्त्याच्या दोन्ही बाजूला चारी मारून साइड पट्टी वरील झाडे, झुडपे काढून साइड पट्टी मोकळी करणे गरजेचे असताना ते काम अर्धवटच आहे. त्यातच या अरूंद रस्त्यावर खडी, दगड,गोटे टाकण्यात आल्याने वाहतुकीस त्याचा मोठा अडथळा निर्माण होत आहे. याबाबत अनेकदा बांधकाम विभागाकडे ग्रामस्थांनी तोंडी व लेखी तक्रारी करूनही याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आल्याचे ग्रामस्थातुन आरोप करुन प्रशासन व लोकप्रतिनिधीबद्दल संताप व्यक्त होत आहे.
तसेच बांधकामविभाग एखादा मोठा अपघात होऊन वाहनधारकांचा बळी जाण्याची वाट पहात आहे का? असाही संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे. यांची दखल घेऊन संबंधित बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालून गुत्तेदारास लवकरात लवकर काम पूर्ण करण्याचे आदेश द्यावेत अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांच्या वतीने देण्यात आला आहे. दरम्यान याप्रकरणी लोहगाव ग्रामपंचायतीचे सरपंच प्रवीण पाटील यांच्याशी फोनवरून संपर्क केला असता त्यांनी फोन घेण्यास टाळले.
रविंद्र दबडे, शिवसेना शाखा प्रमुख, लोहगाव ता.तुळजापूर
जागोजागी रस्ता उखडल्याने व रस्त्याची अत्यंत दुरावस्था झाली आहे. या रस्त्याचे काम दिर्घ काळापासून रखडत पडले आहे.त्यामुळे विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांना नाहकच मनस्ताप सहन करावा लागत आहे. ग्रामस्थांच्या जिव्हाळ्याच्या विषय बनलेल्या याप्रकरणी ग्रामपंचायत लक्ष घालून पाठपुरावा करणे गरजेचे असताना याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसत आहे.