प्रा.डॉ.सचिन कंदले उत्कृष्ट कार्यक्रमाधिकारी पुरस्काराने गौरव 

अणदूर: दि.20 : चंद्रकांत हगलगुंडे

 तुळजापूर तालुक्यातील अणदूरचे सुपुत्र प्रा. डॉ. सचिन चंद्रशेखर कंदले यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर अंतर्गत शिक्षण व विस्तार विभागाच्या वतीने उत्कृष्ट कार्यक्रमाधिकारी पुरस्काराने  सन्मानित करण्यात आले. 

दि.19 रोजी छत्रपती संभाजी नगर येथे आयोजित केलेल्या पुरस्कार वितरण समारंभामध्ये त्यांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.
सन 2003 पासून स्वा. सावरकर महाविद्यालय बीड येथेसंस्कृत विभाग प्रमुख म्हणून ते कार्यरत आहेत. मागील पंधरा वर्षापासून ते महाविद्यालयाच्या आजीवन शिक्षण व विस्तार विभागाचे कार्यक्रम अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू प्रोफेसर विजय फुलारी यांच्या हस्ते व प्र कुलगुरू प्रोफेसर वाल्मिक सरवदे यांच्या उपस्थितीत या पुरस्काराचे वितरण करण्यात आले. 
जलसाक्षरता, वाहन साक्षरता, वृक्ष संवर्धन कार्यशाळा, कुपनलिका पुनर्भरण असे विविध प्रयोग त्यांनी आपल्या कार्यकाळात केले आहेत. कल्पकतेने काम करणारे कार्यक्रमाधिकारी या नात्याने त्यांचा गौरव करण्यात आला. 

त्यांच्या या निवडीबद्दल विद्यापीठाचे कुलगुरू प्रो. विजय फुलारी, प्र कुलगुरू वाल्मिक सरवदे, कुलसचिव प्रो. प्रशांत अमृतकर, राज्यपाल नियुक्त व्यवस्थापन परिषद सदस्य गजानन सानप व अधिष्ठाता आदींनीअभिनंदन केले .
 
Top