नळदुर्ग: जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात ; नगराध्यक्ष बसवराज धरणे यांच्या हस्ते शुभारंभ
नळदुर्ग,दि.०४ :
नळदुर्ग शहरातील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन मंगळवारी मोठ्या थाटात व उत्साहात पार पडले.
नळदुर्ग नगरीचे नगराध्यक्ष बसवराज धरणे यांच्या हस्ते फीत कापून उदघाटन करण्यात आले. ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन उपनगराध्यक्ष नय्यर जागीरदार, नगरसेवक इमाम शेख, आकाश कुलकर्णी, नगरसेविका सुमन ठाकूर,मीनाक्षी काळे, राणी सुरवसे यांच्या हस्ते करून कार्यक्रमास सुरुवात केली.
या कार्यक्रमात इयत्ता पहिली ते पाचवीतील विद्यार्थी व विद्यार्थिनींनी मराठी व हिंदी गीतावर बहारदार नृत्य सादर केले. तसेच पारंपारिक लेझीम कलाही सादर केली. तसेच मुलींचे महत्त्व सांगणारे, शेतकरी आत्महत्या रोखणारे व जिल्हा परिषद मराठी शाळेचे महत्त्व सांगणाऱ्या नाटिका विद्यार्थ्यांनी उत्कृष्टपणे सादर केल्या. विद्यार्थ्यांर्नी नृत्य, गायन ,नाटक, लेझिम ,टिपऱ्या, आदी पारंपरिक कलाही सादर केल्या.
यावेळी राष्ट्रवादीचे युवक शहराध्यक्ष प्रमोद कुलकर्णी, उबाठाचे शहर प्रमुख संतोष पुदाले,
मुख्याध्यापक भास्कर मस्के, सुंदर भालकाटे, जयश्री धुमाळ, प्रीती भंडारे, राहुल खोडके, महादेवी गायकवाड, रेणुका डोंगरे, योगिता माने शालेय शिक्षण व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संजय डुकरे यांच्यासह पालक, विद्यार्थी उपस्थित होते.