गोकुळच्या थकीत ऊस बिलासाठी १० जून रोजी कंबर तलाव येथे शेतकऱ्यांचे जलसमाधी आंदोलन

सोलापूर, दि. ५ जून २०२६ : 

गोकुळ शुगर कारखान्याकडील थकीत ऊस बिलाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला आता अधिक तीव्र स्वरूप प्राप्त झाले असून, येत्या १० जून २०२६ रोजी कंबर तलाव, विजापूर रोड, सोलापूर येथे जलसमाधी आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती गोकुळ थकीत ऊस बिल शेतकरी व शेतकरी संघर्ष समितीने दिली आहे.

याप्रकरणी  सोलापूर जिल्हाधिकारी यांना शुक्रवार दि.५ जुन रोजी दिलेल्या निवेदनात नमुद केले आहे की, गेल्या  १२ दिवसांपासून पूनम गेट येथे ठिय्या आंदोलन सुरू असून, शेतकऱ्यांच्या प्रलंबित ऊस बिलाच्या प्रश्नाकडे प्रशासन आणि कारखाना व्यवस्थापनाचे लक्ष वेधण्यासाठी विविध आंदोलनात्मक पावले उचलण्यात येत आहेत. यापूर्वी ४ जून रोजी सहआयुक्त साखर विभाग, सोलापूर येथे अर्धनग्न आंदोलन करण्यात आले .
आंदोलनाच्या पुढील टप्प्यात १० जून रोजी दुपारी १२. वाजता कंबर तलाव येथे जलसमाधी आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या आंदोलनात सुमारे ५०० शेतकरी सहभागी होणार असल्याचा दावा समितीने केला आहे.

शेतकऱ्यांचे थकीत ऊस बिल तातडीने अदा करण्यात यावे, ही प्रमुख मागणी असून, आंदोलनाची दखल घेऊन संबंधित प्रशासनाने सहकार्य करावे, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. 


या आंदोलनासाठी पूनम गेट, संभाजीवन, सातरस्ता, नवीन जिल्हाधिकारी कार्यालय आणि विजापूर रोड मार्गे कंबर तलाव असा मार्ग निश्चित करण्यात आला आहे.
गोकुळ थकीत ऊस बिल शेतकरी व शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने हे निवेदन संबंधित प्रशासनाला सादर करण्यात आले आहे.
या निवेदनावर अरविंद घोडके, अमोल पाटील, जितेंद्र पाटील, खंडू कचरे, नामदेव महाबोले आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

 
Top