पूर्वीच्या ठिकाणाऐवजी किल्ला गेट ते चावडी चौक दरम्यान आठवडी बाजार; व्यापारी व नागरिकांना दिलासा
नळदुर्ग, दि. ३० जून :
नळदुर्ग शहरातील अनेक वर्षांपासून भरत असलेल्या आठवडी बाजाराच्या ठिकाणी महत्त्वपूर्ण बदल करण्याचा निर्णय नगरपालिकेने घेतला असून, येत्या रविवार, दि. ५ जुलै पासून बाजार नवीन नियोजनानुसार भरविण्यात येणार आहे. याबाबत नगरपालिकेच्या वतीने शहरात दवंडी देऊन शेतकरी, फळ विक्रेते, भाजीपाला व्यावसायिक तसेच सर्व बाजारकरुना नव्या व्यवस्थेचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
गेल्या काही वर्षांत कुरेशी गल्ली ते साठेनगर मार्गावर भरणारा आठवडी बाजार वाहतूकीस अडथळा, अस्वच्छता आणि नागरिकांच्या गैरसोयीचा विषय ठरत होता. अरुंद रस्ता, वाढती गर्दी आणि घाणीचे साम्राज्य यामुळे व्यापारी तसेच नागरिकांकडून सातत्याने नाराजी व्यक्त होत होती. या प्रश्नावर 'तुळजापूर लाईव्ह' तसेच नळदुर्ग व्यापारी मंडळाने सातत्याने आवाज उठवून पर्यायी व्यवस्था करण्याची मागणी केली होती. या मागणीची सकारात्मक दखल घेत नगरपालिकेने बाजाराचे नियोजन बदलण्याचा निर्णय घेतल्याने स्थानिक व्यापाऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
नगरपालिका कर्मचारी आनंद खारवे व सतीश गायकवाड यांनी रविवारी शहरात दवंडी देत जाहीर केले की, दि. ५ जुलैपासून कुरेशी गल्ली ते साठेनगर या मार्गावर शेतकरी, भाजीपाला व फळ विक्रेत्यांनी व्यवसाय करू नये. त्याऐवजी प्राथमिक आरोग्य केंद्र ते ऐतिहासिक किल्ला गेट, पोलीस ठाणे आणि चावडी चौक या परिसरात आठवडी बाजार भरविण्यात येणार आहे.
या बदलामुळे शहरातील वाहतुकीवरील ताण कमी होण्यास मदत होणार असून, पर्यटक, ग्राहक, व्यापारी आणि बाजारकरुना अधिक सुलभ व सुरक्षित वातावरण उपलब्ध होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
दरम्यान, नळदुर्ग व्यापारी महासंघाचे कार्याध्यक्ष मुकूंद नाईक यांनी नगरपालिकेच्या निर्णयाचे स्वागत करताना सांगितले की, "भाजीपाला व साप्ताहिक बाजार किल्ला गेट ते चावडी चौक या परिसरात नियमित भरविण्याच्या व्यापारी मंडळाच्या मागणीची सकारात्मक दखल घेऊन दवंडीद्वारे सूचना करण्यात आली आहे. तसेच येत्या रविवारी बॅरिकेट्स उभारण्याचा निर्णय घेतल्याबद्दल नगरपालिकेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि मुख्याधिकारी यांचे मनःपूर्वक आभार. व्यापारी व नागरिकांच्या हिताला प्राधान्य देत घेतलेला हा निर्णय निश्चितच स्वागतार्ह असून शहराच्या सुव्यवस्थित विकासासाठी महत्त्वाचा ठरणार आहे."