देशमुखवाड्यातील नृसिंहाचे ऐतिहासिक स्मरण पुन्हा उजळणार; पिंपळवृक्षाखालील पवित्र स्थळाच्या जीर्णोद्धारासाठी हिंदू बांधवांची धडपड
जागृत देवस्थानाचे जतन-संवर्धन करण्यासाठी नागरिक एकवटले; पालिकेकडून स्वच्छता व मार्ग मोकळ
नळदुर्ग, दि. ४ जुलै :
नळदुर्ग शहरातील ब्राह्मण गल्ली व गवळी गल्ली परिसरातील ऐतिहासिक देशमुखवाडा आणि पिंपळवृक्षाखालील नृसिंहाचे सिंहासन परिसराचे जतन, संवर्धन व जीर्णोद्धार करण्यासाठी शहरातील हिंदू बांधवांनी पुढाकार घेतला असून या पवित्र स्थळाचे ऐतिहासिक महत्त्व पुन्हा अधोरेखित होत आहे.
स्थानिकांच्या माहितीनुसार आणि उपलब्ध ग्रंथातील उल्लेखानुसार, नीरा नृसिंहपूर येथील श्री भगवान नृसिंहाची मूळ मूर्ती औरंगजेबाच्या मोहिमेदरम्यान सुरक्षिततेच्या दृष्टीने इ.स. १६८५ मध्ये निलेगावकर नरसिंहराव देशमुख यांनी नळदुर्ग येथील देशमुखवाड्यात आणून काही काळ विधिवत स्थापित केली होती. त्या काळात येथे नियमित पूजा-अर्चा होत असल्याचा उल्लेख ग्रंथात आढळतो. पुढे औरंगजेबाच्या मृत्यूनंतर इ.स. १७०७ मध्ये नीरा नृसिंहपूरच्या पुजाऱ्यांनी मूळ मूर्ती विधिवत परत नेल्याचेही नमूद करण्यात आले आहे.
याच ऐतिहासिक स्मृतीशी निगडित देशमुखवाडा परिसरात आजही पिंपळवृक्षाखाली नृसिंहाचे सिंहासन व प्राचीन शिळा असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे हे स्थळ धार्मिक व ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचे मानले जात असून येथे नृसिंह मंदिर आणि हनुमान मंदिराचा जीर्णोद्धार करून परिसराचे जतन व संवर्धन करण्यासाठी स्थानिक हिंदू बांधव प्रयत्नशील आहेत.
गेल्या काही वर्षांत या परिसरात मोठ्या प्रमाणात पडझड झाली होती. झाडे-झुडपे, मातीचे ढिगारे तसेच दगडधोंड्यांमुळे मुख्य कमानीपासून मंदिराकडे जाणारा मार्ग पूर्णपणे अडथळाग्रस्त झाला होता. याबाबत समाजमाध्यमांवर जनजागृती करण्यात आल्यानंतर नगरपालिका प्रशासनाने तातडीने दखल घेत मुख्य प्रवेशमार्गावरील अडथळे दूर करून स्वच्छता मोहीम राबविली व मंदिराकडे जाणारा रस्ता मोकळा केला.
या पवित्र स्थळाचा सर्वांगीण जीर्णोद्धार, सुशोभीकरण आणि संवर्धन लवकरच करण्यात येणार असल्याची माहिती संबंधित समितीच्या पदाधिकाऱ्यांनी दिली. ऐतिहासिक व धार्मिक वारशाचे जतन करण्यासाठी नागरिकांनीही सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
"नीरा-नृसिंहपूर येथे दर्शनादरम्यान तेथील आचार्यांकडून ग्रंथातील ऐतिहासिक उल्लेखाला दुजोरा मिळाला. भगवान श्रीनृसिंहाची मूळ मूर्ती काही काळ नळदुर्गच्या देशमुखवाड्यात होती, अशी माहिती त्यांनी दिली. त्यामुळे या पवित्र स्थळाचे जतन, संवर्धन व जीर्णोद्धार व्हावा, ही अनेकांची श्रद्धा आहे. यासाठी लवकरच सर्व हिंदू बांधवांची संयुक्त बैठक घेऊन पुढील कार्यवाही सुरू करण्यात येणार आहे."
प्रमोद कुलकर्णी, नळदुर्ग